New OTT Platforms Launch: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घर बसल्या मनोरंजनाचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनानंतर ओटीटीला अक्षरशः सुगीचे दिवस आले आहेत. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जगभरातील गाजलेले चित्रपट घर बसल्या बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळत असल्यामुळे लोकांचा याकडे कल वाढला आहे. अनेक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेतच. पण, यात आता आणखी दोन नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची भर पडणार आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुपने नुकत्याच त्यांच्या दोन नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्स, 'अल्ट्रा प्ले' आणि 'अल्ट्रा गाने'ला लाँच करून हिंदी सिनेमा आणि संगीताच्या चाहत्यांना आनंडाची बातमी दिली आहे.
'अल्ट्रा प्ले' आणि 'अल्ट्रा गाने' हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स केवळ हिंदी भाषेतील कंटेंटवर भर देणार असून, क्लासिक बॉलिवूड चित्रपट आणि सदाबहार हिंदी गाण्यांचा एक अनोखा संग्रह प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. .
'अल्ट्रा प्ले' हा भारतातील पहिला असा ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे, जो केवळ हिंदी क्लासिक चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनीच्या 'हर पल फिल्मी' या मोहिमेअंतर्गत, या प्लॅटफॉर्मवर २००० हून अधिक विविध प्रकारचे हिंदी चित्रपट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १९५० पासून आतापर्यंतच्या ब्लॉकबस्टर, कल्ट क्लासिक आणि अनेक विस्मरणीय चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना मिळणार आहे.
यासोबतच लाँच करण्यात आलेल्या 'अल्ट्रा गाने' या प्लॅटफॉर्मवर ४००० हून अधिक सदाबहार हिंदी गाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 'बाबूजी धीरे चलना', 'रूप तेरा मस्ताना' अशी अनेक लोकप्रिय गाणी या प्लॅटफॉर्मवर ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. आजही, प्रेक्षकांशी थेट जोडणारी आणि भावनांना साद घालणारी ही गाणी अजूनही तितकीच आकर्षित करतात. याशिवाय, दर आठवड्याला नवीन हिंदी गाणीही या प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाणार आहेत.
या नव्या उपक्रमाविषयी बोलताना अल्ट्रा मीडिया व एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, ‘आतापर्यंत अल्ट्राने हिंदी, मराठी व इतर भाषांमधील अनेक चित्रपटांचे हक्क संपादित केले आहेत. भारतातील समृद्ध सिनेमांचा व सांगीतिक वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत सातत्याने पोहोचवण्याच्या वाटचालातील हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. जुने हिंदी चित्रपट आणि गाणी अजूनही पाहिली जातात आणि या अॅप्समुळे प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची लोकप्रियता नक्कीच वाढेल. भविष्यातील ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून इतर भाषांमध्ये विस्तारीकरण करण्यासाठीच्या संधीसाठी आम्ही आतापासूनच तयारी करत आहोत.’