Ekta Kapoor on Hindu Dharma: टीव्हीपासून बॉलिवूड आणि ओटीटीपर्यंत… अवघ्या मनोरंजन विश्वावर राज्य करणारी प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एकता आज जिथे आहे, त्या यशाच्या टप्प्यावर पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते. करिअरच्या या प्रवासात एकताला प्रोफेशनल लाईफमध्येच नाही, तर पर्सनल लाईफमध्येही खूप ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. कधी तिच्या टीव्ही मालिकांवरून, तर कधी वेब सीरिजवरूनही बराच गदारोळ निर्माण झाला होता.
सध्या एकता तिच्या आगामी 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता एकताने ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये तिच्या धर्माबद्दल आणि इतर धर्माच्या लोकांबद्दल भाष्य केले आहे. या दरम्यानचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
'द साबरमती रिपोर्ट'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये एकता कपूरने तिच्या चित्रपटाची तसेच धर्माची खिल्ली उडवणाऱ्यांवरही निशाणा साधला. एकताने लोकांना 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाची कथा पाहण्याचे आवाहन केले. आपल्या हिंदू धर्माचा आदर करत एकता कपूर म्हणाली की, 'मी हिंदू आहे म्हणून मी आयुष्यात कधीही भीतीपोटी काम केले नाही. पण याचा अर्थ तुम्ही सेक्युलर आहात, असे नाही. मी हिंदू आहे म्हणून मी इतर कोणत्याही धर्मावर भाष्य करणार नाही. मला म्हणायचे आहे की माझे सर्व धर्मांवर प्रेम आहे. कारण मी हिंदू आहे आणि ही माझ्या धर्माची शिकवण आहे.'
एकता कपूरने या मुलाखतीत आपल्या ट्रोलिंगबद्दल बोलताना पुढे सांगितले की, ‘मी पूर्वी कपाळावर टीळा लावत असे. माझ्यावर, माझ्या टिळ्यावर, हिंदू धर्मानुसार तयार होण्यावर, माझ्या ब्रेसलेटवर, अंगठीवर इतके जोक्स केले गेले, मी मंत्रोच्चार केले, ध्यान केले, मी माझे मंत्र बोलले, तर त्यावरही विनोद होतो.... पूजा करत असतानाही लोक मध्ये येतात. यार, तुमचा यावर विश्वास नसेल. पण, माझ्या विश्वासासाठी मी ते करते.’ एकता कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा मुख्य भूमिकेत आहेत.