Netaji Subhas Chandra Bose Birth Anniversary: आज (२३ जानेवारी) देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७वी जयंती साजरी केली जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव घेतले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ‘इंडियन नॅशनल आर्मी’ अर्थात ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली होती. त्यांचा हाच जीवनप्रवास आजवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक चित्रपट तयार झाले. या व्यतिरिक्त, त्यांच्या मृत्यूचे गूढ अनेक भारतीय चित्रपट कथानकाचा अविभाज्य पैलू बनले. एका नजर टाकूया सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित अशाच काही चित्रपट आणि सीरिजवर..
‘राग देश’ हा चित्रपट दुसर्या महायुद्धानंतरच्या कालखंडावर बेतलेला आहे. या चित्रपटात तो काल दाखवण्यात आला आहे, जेव्हा सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील सैन्य देशात परत येते आणि ब्रिटिशांशी लढण्यासाठी नव्या लोकांची भरती करू लागते. हा चित्रपट त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सारांश दाखवणारा आहे. तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित या चित्रपटात कुणाल कपूर, अमित साध, मोहित मारवाह, विजय वर्मा आणि मृदुला मुरली, केनी बासुमातारी यांसारखे कलाकार झळकले आहेत.
लेखक औज धर यांच्या ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप’ या पुस्तकावर आधारित वेब सीरिज ‘बोस: डेड/लाइव्ह’ची निर्माती एकता कपूरने केली होती. नऊ भागांच्या या सीरिजची कथा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूचे, आणि त्याच्याशी संबंधित षड्यंत्र सिद्धांतांवर केंद्रित आहेत. तैवानमधील विमान दुर्घटनेतून नेताजी बचावले असल्याची शक्यता तपासण्याचा या सीरिजच्या कथानकाचा उद्देश आहे. या सीरिजमध्ये अभिनेता राजकुमार राव यांने मुख्य भूमिका साकारली आहे.
'गुमनामी' हा सृजित मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट काल्पनिक आणि काही परिस्थितीजन्य तथ्यांची सांगड घालून बनवला गेला आहे. या चित्रपटाचं कथानक प्रोसेनजीत चटर्जी यांनी साकारलेल्या ‘गुमनामी बाबा’ भोवती फिरणारं आहे. या बंगाली चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की, हा ‘गुमनामी बाबा’ म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस असू शकतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत नक्की काय घडले असे, याचा अंदाज बांधणारा हा चित्रपट आहे.
'नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो’ या चित्रपटाचं कथानक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नजरकैदेतून सुटका, भारतातून प्रयाण आणि आझाद हिंद सेनेची स्थापना यावर केंद्रित आहे. या चित्रपटात आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे चित्रण करण्यात आले आहे. सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. या चित्रपटात जिशु सेनगुप्ता, कुलभूषण खरबंदा आणि दिव्या दत्ता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
'समाधी' हा चित्रपट एक स्पाय थ्रिलर आहे, ज्याचे दिग्दर्शन रमेश सैगल यांनी केले होते. या चित्रपटात स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष तसेच, सुभाषचंद्र बोस यांची विचारधारा आणि राजकीय विचारांचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट थेट सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित नाही. मात्र, या चित्रपटात आझाद हिंद सेनेच्या सैनिकाच्या संघर्षावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
संबंधित बातम्या