Neena Kulkarni New Marathi Serial: मराठी मालिका विश्वात सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नव्या मालिकांसाठी चाहत्यांची उत्सुकता देखील खूप वाढलेली दिसत आहे. एक, दोन, तीन नव्हे तर अनेक नव्या मालिका छोट्या पडद्यावर एन्ट्री घेणार आहेत. यातच आता आणखी एका नव्या मालिकेचं बिगुल वाजलं आहे. या नव्याकोऱ्या दमदार मालिकेतून अभिनेत्री नीना कुळकर्णी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक करताना दिसणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ असे या मालिकेचे नाव असून, अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी ही नवी कोरी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या ज्येष्ठ दिग्गज अभिनेत्री नीना कुळकर्णी या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या आधी नीना कुळकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक मालिका गाजवल्या आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्या मोठ्या पडद्यावर व्यस्त असल्याकारणाने छोट्या पडद्याकडे फारसे लक्ष देऊ शकल्या नव्हत्या. आता ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून पुन्हा एकदा नीना कुळकर्णी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तर, या मालिकेच्या प्रोमोमध्ये नीना कुळकर्णी यांना एका प्रेमळ आईच्या भूमिकेत पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील या नव्या मालिकेसाठी आतुर झाले आहेत. ‘ऐक ना जनाचं, ते ऐक ना मनाचं...’ अशी टॅगलाईन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका एका हटके विषयावरती आधारित असणार आहे.
‘स्वाभिमान’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात स्थान मिळवणारी अभिनेत्री पूजा बिरारी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तर, अनेक चित्रपट, मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’ गाजवणारा अभिनेता विशाल निकम या मालिकेतून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अतिशा नाईक पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये अतिशाच्या खलनायिकेचा खतरनाक अंदाज पाहायला मिळाला आहे.
‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका कोणत्या स्लॉटमध्ये प्रेक्षकांना प्रेक्षकांना पाहायला मिळणार, हे अद्याप समोर आलेलं नाही. तर, ही नवी मालिका केव्हापासून सुरू होणार, हे देखील अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र, मालिकेच्या या धमाकेदार ट्रेलरनी सगळ्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.