Neena Gupta In Hospital: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच काहीना काही कारणांमुळे माध्यमांमध्ये चर्चेत असतात. कधी पहिल्या लग्नाविषयी खुलासे, तर कधी दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करून त्या सोशल मीडियावर चर्चेत असतात. मात्र, अभिनेत्री नीना गुप्त सध्या दिल्लीत असून, त्यांची प्रकृतीही बिघडली आहे. तब्येत खराब झाल्यामुळे नीना गुप्त चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. मात्र, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांच्यासोबत असे काही घडले की, नीना गुप्ता यांना आपला राग अनावर झाला होता. त्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री नीना गुप्ता आपली तपासणी करण्यासाठी गुडगावमधील रुग्णालयात गेल्या होत्या. यादरम्यान, चेकअपपूर्वी अभिनेत्रीला भरण्यासाठी खूप लांब लचक फॉर्म देण्यात आला होता. आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या नीना गुप्ता यांना हा फॉर्म बघून प्रचंड संताप झाला. पण, त्यांचा रागाचा पार आणखीनच वाढला, जेव्हा त्यांना तपासणीआधी फॉर्मवर धर्माबद्दल विचारण्यात आले. नीना गुप्ता यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
नीना गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत या फॉर्मलिटी फॉर्मची झलक दाखवली होती. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणाल्या की, 'मी आता एका मोठ्या रुग्णालयात आले आहे. सध्या मी एक नोंदणी फॉर्म भरत आहे. पण हा फॉर्म बघून वाटत आहे की, तो भरून होईपर्यंत मी आणखी आजारी पडेन. मी फार आजारी नसले, तरी हा फॉर्म भरावा लागणार आहे. आणि कहर म्हणजे या आता धर्मासंबंधित एक कॉलम देण्यात आला आहे.’
अभिनेत्री नीना गुप्ता यांनी जेव्हा नोंदणी फॉर्ममध्ये धर्मासंबंधित रकाना पाहिला, तेव्हा त्या प्रचंड संतापल्या. त्या म्हणाल्या की, 'अहो, हे अजूनही होत आहे. अरे देवा, आता आमचं काय होणार?’ नीना गुप्ता यांनी हॉस्पिटलमध्ये जातानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. यामध्ये त्यांनी आपण गेल्या १० मिनिटांपासून ट्रॅफिकमध्ये कशाप्रकारे अडकलो होतो, हे दाखवले होते. अभिनेत्री नीना गुप्ता अखेर 'मस्त में रहने का' या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता जॅकी श्रॉफ दिसला होता. चाहत्यांना त्यांचा हा चित्रपट खूप आवडला होता.