गेल्या काही दिवसांपासून 'लेडी सुपरस्टार' म्हणजेच अभिनेत्री नयनतारा ही चर्चेत आहे. या चर्चा तिचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अन्नपूर्णी' या चित्रपटामुळे रंगल्या आहेत. या चित्रपटातील काही दृश्यांवर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे नेटफ्लिक्सने तातडीने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवला. आता या प्रकरणी नयनताराने माफी मागितली आहे.
नयनताराने एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टची सुरुवात ही जय श्रीराम असे बोलून केली आहे. 'मी अतिशय जड अंत:करणाने अन्नपूर्णी चित्रपटाशी संबंधीत ही नोट लिहिली आहे. हा चित्रपट एक असा चित्रपट आहे जो लोकांना आयुष्यात पुढे जाऊन काही तरी योग्य करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. एक सकारात्मक संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण चुकून काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. आम्हाला वाटले नव्हते की एक सेंसॉर सिनेमा जो आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता तो अचानक ओटीटीवरुन हटवण्यात येईल' या आशयाची पोस्ट नयनताराने केली आहे.
वाचा: काय? या रॅपरने बसवले टायटेनियमचे दात, खर्च ऐकून व्हाल चकीत
पुढे ती पोस्टमध्ये म्हणाली, 'मी किंवा माझ्या टीमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नव्हता. आम्ही सगळे भावनांचा आदर करतो कारण आमचा देवावर विश्वास आहे. आम्ही देशातील अनेक मंदिरांमध्ये दर्शन घेतले आहे. त्यामुळे आम्ही मुद्दाम तर केलेले नाही. ज्यांना असे वाटते की माझ्याकडून चूक झाली आहे त्यांची मी मनापासून माफी मागते.'
‘अन्नपूर्णी’च्या या एका सीनमध्ये जेवण बनवण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेताना नायिका डोक्यावर ओढणी बांधून नमाज पढताना दाखवली आहे. कॉलेजमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आपल्या मित्रांना चविष्ट बिर्याणी खायला देता यावी, म्हणून ती आधी नमाज अदा करते. यामुळे तिची बिर्याणी अधिक रुचकर बनते, असे तिला वाटते. म्हणूनच ती पुढे प्रत्येक वेळी हीच गोष्ट करत राहते. याच सीनमुळे वादंग मजला. तर, दुसऱ्या एका सीनमध्ये नायिकेचा मित्र तिला मांस खाऊ घालण्यासाठी भगवान राम मांसाहारी असल्याचे उदाहरण देतो. यासोबतच या चित्रपटातून हिंदू धर्म ग्रंथ आणि पुराणांचा विपर्यास केला गेला आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.