बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर नवाजुद्दीनची मुलगी शोराची चर्चा रंगली आहे. शोरा सध्या लंडनमधील वेस्ट एंड स्टेज थिएटर समर स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिने तेथे म्युझिकल ब्युटी अँड द बीस्ट हे नाटक सादर केले आहे. नवाजुद्दीनने मुलीचे कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी देखील शोराचे कौतुक केले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने मुलीचा अभिमान वाटत असल्यामुळे इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शोराच्या नाटकानंतरचा आहे. गेल्या महिन्यात शोराला अभिनयाचे धडे घेण्यासाठी नवाजुद्दीन लंडनला सोडून आला होता. तिला अभिनयाची आवड असून यामध्येच करिअर करायचे आहे असे नवाजुद्दीन म्हणाला होता.
नुकताच नवाजुद्दीनने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये स्वत:चे अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या मुलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवणे यामध्ये समाधान वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नवाजने, 'अर्थात याचा मला अभिमान वाटतो. प्रत्येक कार्यशाळा आणि प्रशिक्षण संस्था आपल्याला अशा गोष्टी शिकवू शकते ज्याबद्दल आपल्याला माहित नसेल. अशा प्रतिष्ठेच्या संस्थेतून ती शिकत असेल, तरच चांगलं आहे. याचा फायदा तिच्या करिअरलाच होणार आहे. तज्ञ जे शिकवतात त्यामुळे तुमचं मन प्रोत्साहीत होते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवातून जे शिकायला तुम्हाला अनेक वर्षे लागली असतील, ती प्रशिक्षणामुळे खूप लवकर शिकायला मिळतात.'
कलाकारांना प्रशिक्षणाची गरज असते असे नावज म्हणाला. 'माझा प्रशिक्षणावर विश्वास आहे. तुम्ही सहज उठून जाऊ शकत नाही. जर तुम्हाला खरच अभिनेता बनायचे असेल तर कोणता तरी वर्कशॉप करावा लागेल. मग तो छोटा असू दे किंवा मोठा. नाही तर काही तरी गंभीर काम करणार ना. असे असणे गरजेचे आहे कारण प्रत्येक गोष्टीचे ज्ञान घेणे गरजेचे असते. जन्मापासूनच अभिनेता आहे असे काही नसते. प्रत्येक गोष्टीचे वैशिष्ट्य असते. मी तुमचे काम करु शकत नाही. तुम्ही माझे काम नाही करु शकत, त्यामुळे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे' असे नवाजुद्दीन म्हणाला.
वाचा: सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे खेळणार 'एक डाव भुताचा', काय आहे नेमकी भानगड वाचा
शोराने त्याच्या अभिनयाच्या अनुभवातून काय शिकावे असे नवाजुद्दीनला विचारले तर तो काही बोलला नाही. 'मी कोणाच्याही डोक्यावर प्रेशर टाकू इच्छीत नाही. मी हे केले म्हणून तुम्ही देखील हेच करणे गरजेचे नाही. ती जगाला स्वत:च्या दृष्टीकोनातून पाहात आहे आणि हे करणे गरजेचे आहे. आयुष्यात काय करावे हे स्वत: ठरवायचे असते. कोणी तरी लादले म्हणून करु नये. ते करण्याची जिद्द असायला हवी. माझा अनुभव, प्रशिक्षण आणि जीवन हे पूर्णपणे वेगळे आहे. मी ज्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहातो तो माझा एक वेगळा अनुभव आहे. त्यामुळे मी शोरावर कोणतेही प्रेशर टाकू इच्छीत नाही. तिला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत' असे नवाज पुढे म्हणाला.