Navri Mile Hitlerla latest update: 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत सध्या धमाकेदार कथानक पाहायला मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील अभिराम आणि लीलाची जोडी सगळ्यांनाच आवडू लागली आहे. दोघांचे लुटूपुटूचे भांडण आणि प्रेम पाहण्यात प्रेक्षकांचे देखील मनोरंजन होत आहे. नुकतंच या मालिकेत अभिराम आणि लीला यांचं लग्न झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दोघांचं लग्न प्रेमामुळे नाही तर, एका विचित्र घटनेमुळे घडलं होतं. लीलाची बहीण रेवती हिला विक्रांतने किडनॅप केल्यामुळे तिला हे लग्न करावं लागलं होतं. तर, रेवतीला डांबून ठेवणारी ही व्यक्ती अभिरामचं आहे, असं लीलाला वाटत आहे. मात्र, आता तिच्यासमोर सगळी सत्य परिस्थिती येणार आहे. दुसरीकडे लीलाची पहिली मंगळागौर आता पार पडणार आहे.
मालिकेत आता लीलाची पहिली मंगळागौर साजरी होणार आहे. येत्या आठवड्यात प्रेक्षकांना ही मंगळागौर पाहायला मिळणार आहे. जहागीरदार घरातल्या सूना आणि नातं सुनांनी यासाठी जोरात तयारी केली आहे. सगळ्याजणी नऊवारी नेसून आणि दागिने घालून छान तयार होणार आहेत. पण, या मंगळागौरीत फक्त खेळच रंगणार नाहीत, तर रेवतीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या विक्रांतच सत्य ही सर्वांसमोर येणार आहे. लीलाच्या मंगळागौरीत लीलासमोर विक्रांतचं सगळं सत्य समोर येणार आहे. आणि हे सत्य पूजाला म्हणजेच विक्रांतच्या बायकोला देखील कळणार आहे.
आपल्या पतीच्या या कारनाम्यासाठी पूजा लीलाची माफी मागणार आहे. पण, पूजा लीलाकडून विक्रांतसोबत बोलण्यासाठी थोडा वेळ मागून घेणार आहे. तर, जहागीरदारांच्या घरात मंगळागौरी दरम्यान लीला आणि तीन सुनांचं जंगी भांडण होणार आहे. त्यामुळे सरोजिनी आई हा कलह थांबवण्यासाठी लीला आणि एजेला देवदर्शनाला पाठवणार आहे. देवदर्शनाला जात असताना किशोर लीलावर हल्ला करवणार आहे. यामुळे लीलाचा जीव धोक्यात आल्याचं बघून त्यामुळे एजेचा जीव कासावीस होणार आहे.
एजे-लीला घरी आल्यानंतर पूजा आणि विक्रांत लीलाला सगळं सांगण्यासाठी बाहेर बोलवतात. पण, एजे विक्रांतला सगळ्यांच्या समोर आधीच दोषी ठरवतात आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देतात. यामुळे आता लीलाची खात्री पटली आहे की, एजे निर्दोष आहे आणि तिचं त्यांच्याशी चुकीची वागली आहे. आता या अपमानाने खवळलेला विक्रांत, पूजा आणि लीलाला जीवे मारायचं ठरवणार आहे. यामुळे लीलाचा जीव पुन्हा धोक्यात येणार आहे. आता यावेळीही एजे वेळेत पोहचून लीलाचा जीव वाचवू शकतील का? कशी साजरी होईल लीलाची पहिली मंगळागौर? हे सगळं मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.