‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना लीलाची आई अर्थात कालिंदी लीलासाठी एक नवरा मुलगा बघायला येणार असल्याचं सगळ्यांना सांगताना पाहायला मिळणार आहे. लीलाच्या सावत्र आईने आता तिला कर्जाच्या बदल्यात एका व्यक्तीच्या गळ्यात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. लीला गोंधळी आणि थोडीशी वेंधळी असली, तरी घरातील सगळ्यांवरच तिचा फार जीव आहे. मात्र, लीलाची सावत्र आई तिचा प्रचंड तिरस्कार करते. लीलाच्या जन्मानंतर काहीच दिवसांत तिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी लीलाच्या मावशीशी लग्न केले. नात्याने लीलाची सावत्र आई ही तिची मावशी असली, तरी ती तिला सावत्र वागणूकच देते. मात्र, लीला आपल्या मावशी आईला कधीच दुजाभाव देत नाही.
आपल्या मावशी आईने आपल्यावर कधीतरी खुश व्हावं, यासाठी लीला काहीही करायला तयार असते. नुकतेच रेवतीचे लव्ह लेटर आणि ग्रीटिंग लीला जाळत असताना, ते कालिंदीच्या हाती लागतात आणि चिडलेली कालिंदी थेट लीलाचं लग्न लावायलाच निघते. लीलाच्या आई-वडिलांनी बेकरी चालवण्यासाठी एका साळुंके नावाच्या व्यक्तीकडून भरघोस पैसे कर्ज म्हणून घेतलेले असतात. मात्र, त्याचं व्याज आणि हफ्ते देता येत नसल्याने हा साळुंके सतत दुकानातील काही ना काही वस्तू उचलून नेत असतो.
साळुंकेची ही कटकट थांबवण्यासाठी लीलाच्या सावत्र आईने साळुंकेसोबत एक करार केला आहे. २५ लाखांच्या कर्जाच्या बदल्यात कालिंदीने लीलाचे लग्न साळुंकेसोबत लावण्याचे कबूल केले आहे. आता साळुंके लग्नासाठी उतावळा झाला असून, तो लीलाला मागणी घालायला घरी येणार आहे. ही गोष्ट केवळ लीलाची आई कालिंदी हिलाच माहिती होती. साळुंकेबद्दल घरी कसं सांगावं, हा प्रश्न तिच्या समोर होता. मात्र, लीलाची न केलेली चूकही पकडली गेल्याने आता कालिंदीने लीलाचं लग्न लावून द्यायचं, हे ठरवूनच टाकले आहे. आता लीलाच्या घरी तिच्या बघण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.
लीला बघायला नक्की कोण येणार, याबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. मात्र, दारात साळुंके उभा ठाकलेला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले. ‘काहीही झालं तरी माझ्या मुलीचा आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. माझ्या कर्जापाई मी तिचा बळी जाऊ देणार नाही’, असं म्हणत आता लीलाचे वडील या लग्नाला थेट नकार देणार आहेत. मात्र, लीलाच्या वडिलांचा नकार ऐकून आता कालिंदी अख्खं घर डोक्यावर उचलून घेणार आहे. कर्जाच्या बदल्यात लीलाला साळुंकेच्या गळ्यात बांधायचं, हे कालिंदीन पक्कं केलं आहे. आता यासाठी कालिंदी काय नवीन चाल खेळणार, हे मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या