‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात लीला अभिरामने दिलेली अंगठी हरवताना दिसणार आहे. अभिरामने स्वतःच्या इच्छेविरोधात अंतराची अंगठी लीलाला देऊ केली आहे. साखरपुड्याच्या दिवशी अंतराची हीच अंगठी अभिराम लीलाच्या हातात घालणार आहे. मात्र, त्याआधी लीलाला ही अंगठी सांभाळून ठेवावी लागणार आहे. लीला आधीपासूनच वेंधळी आहे, हे अभिरामला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे लीलाच्या हातात अंगठी दिल्यानंतर सतत दहा-पंधरा मिनिटांनी लीलाला फोन करून अंगठी दाखवण्याचा हट्ट करत असतो. मात्र, अभिराम दर दहा-पंधरा मिनिटांनी फोन करतोय, त्यातही सतत व्हिडीओ कॉल करून अंगठी बघण्याची मागणी करतोय, त्यामुळे लीला खूप वैतागून गेली होती. अखेर यांना धडा शिकवायचा असं पक्क करून लीलाने ती अंगठी लपवून ठेवली आणि अभिरामला सांगितलं किती अंगठी तिच्याकडून चुकून हरवली.
अंगठी हरवली हे ऐकताच अभिराम चांगलाच हादरला. तडक लीलाच्या घरी पोहोचलेला अभिराम अस्वस्थ होऊन संपूर्ण घरामध्ये अंतराची अंगठी शोधत होता. तर, लीला त्याची ही गंमत बघत होती. ती अंगठी का इतकी महत्त्वाची आहे, असा प्रश्न लीलाला पडला होता. यावर लीला अभिरामला म्हणते की, ‘फार फार तर ती अंगठी चार एक ग्रॅमची असेल. पंचवीस तीस हजाराच्या अंगठीसाठी तुम्ही इतके अस्वस्थ का होत आहात? अशा हजारो अंगठ्या तुम्ही सहज विकत घेऊ शकता’. मात्र, अभिराम तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अस्वस्थपणे पूर्ण घरामध्ये ती अंगठी शोधत असतो.
अभिरामची किव आल्यामुळे लीला ती अंगठी कुठे ठेवली आहे, हे अभिरामला सांगते. ती अंगठी हातात मिळाल्यानंतर अभिरामच्या जीवात जीव येतो. अंगठी मिळत नाही म्हणून अस्वस्थ झालेला अभिराम पाहून लीला देखील कावरी बावरी झाली होती. तर, ‘ही अंगठी माझ्या अंतराची असून, माझी इच्छा नसताना देखील ती तुला द्यावी लागली आहे. ही अंगठी म्हणजे माझा जीव आहे. ही अंगठी हरवली, तर मी जगू शकणार नाही’, असं अभिराम लीलाला सांगतो.
अभिरामच्या या बोलण्यानंतर लीलाला त्या अंगठीचे महत्त्व कळते. आपण अभिरामची थट्टा करून चूक केली, त्याला सॉरी म्हणायला हवं असा विचार करून लीला अभिरामला फोन करून त्याची माफी मागते. यानंतर आता ही अंगठी जपून व्यवस्थित ठेवण्याचा निर्णय तिने घेतला आहे. आता या अंगठीवरून काय रामायण महाभारत घडणार हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या