‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात लीला पुन्हा एकदा एजेच्या हॉटेलमध्ये जाऊन गोंधळ घालताना दिसणार आहे. नुकतीच अभिरामने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अभिराम जहागीरदार याने आपल्या होणाऱ्या बायकोचं नाव जाहीर केलं. रेवतीला विक्रांत तावडीतून सोडवण्याच्या बदल्यात अभिरामने लीलाकडून एक वचन घेतलं होतं. लीलाने मी बहिणीसाठी जीवही देऊ शकते, असं म्हणत अभिरामला वचनही देऊन टाकलं होतं. अभिरामने तर त्याचं वचन पूर्ण केलं, आता लीलाला तिचे वचन पूर्ण करावे लागणार आहे. या वचनाच्या बदल्यात अभिरामनी लीलाकडून लग्न करण्याचं कबूल करून घेतलं आहे. मात्र, लीला मनापासून या लग्नासाठी तयार नाही.
पार्टीत आपलं नाव जाहीर करू नये, यासाठी लीलाने अभिरामकडून पुन्हा एक वचन घेतलं होतं. मात्र, त्या पार्टीत अभिरामने लीलाचं नाव जाहीर केलं. भर पार्टीत आपलं नाव जाहीर झाल्यावर लीलाला देखील मोठा धक्का बसला आहे. आता अभिरामला त्रास देण्यासाठी लीला थेट त्याच्या हॉटेलवरच पोहोचणार आहे. अभिराम त्याचा रेस्टॉरंटमध्ये शेफच्या टीमला एक पदार्थ बनवायला शिकवत असताना तिथे धडकलेली लीला अभिरामच्या किचनमध्ये शिरून त्यालाच धमकी देणार आहे.
‘माझ्याशी लग्न कराल, तर मी तुमचं आयुष्य असंच उद्ध्वस्त करेन, असं म्हणून लीला लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, अभिराम याला बधत नाहीये हे बघून, लीला पुन्हा एक नवी धमकी देणार आहे. ‘मी तुमच्याशी लग्न करेन, तुमचा हा हट्ट देखील पूर्ण करेन. मात्र, लग्नानंतर तुमचा रोजचा दिवस असाच एका नव्या तमाशाने सुरू होईल, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला पुन्हा एक संधी देण्याचा प्रयत्न करतीये. येत्या २४ तासात तुम्ही स्वतःहून हे लग्न मोडा, नाहीतर शिक्षा भोगायला तयार राहा’, असं म्हणून लीलाने अभिरामसोबत जुळलेलं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अभिराम लीलाच्या या धमकीलाही अजिबात घाबरणार नाहीये.
दुसरीकडे, आता अभिरामच्या सुना म्हणजे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिघीही लीलाची परीक्षा घेणार आहेत. यात त्या अभिरामच्या पहिल्या बायकोची म्हणजे अंतराची अंगठी लीला देणार आहेत. ही अंगठी लीलानी साखरपुड्यापर्यंत सांभाळली तरच आम्ही तिचा स्वीकार करू, असं या तिघींनी ठरवलं आहे. आता मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये हा रंजक ट्रॅक पाहायला मिळणार आहे.