Navri Mile Hitler La Full Cast: १८ मार्चपासून झी मराठीवर 'नवरी मिळे हिटलरला' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत कोण-कोण कोणत्या भूमिका साकारणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तर, ही छोटीशी ओळख 'नवरी मिळे हिटलरला' च्या कलाकारांची आणि त्यांच्या व्यक्तिरेखांची...
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत राकेश बापट AJ ची म्हणजेच अभिराम जहागीरदारची भूमिका साकारत आहे. अभिराम त्यांच्या डॅशिंग व्यक्तिमत्व, शिस्तबद्ध, वक्तशीरपणासाठी ओळखला जातो, ज्यामुळे त्याला ‘हिटलर’ हे टोपणनाव मिळाले आहे. अभिरामच्या घरात तीन सुना आहेत, ज्या त्याच्यासाठी नवरी शोधण्या करिता सज्ज झाल्या आहेत.
अभिनेत्री वल्लरी विराज या मालिकेत ‘लीला’ची भूमिका साकारत आहे. लीला बहिर्मुख आहे. सर्वांची मदत करणे हाच तिचा उद्देश असतो. पण, लीलाची लीला इतकी अपरंपार आहे की, मदतीसाठी दिलेला हात काही तर घोळ घालून जातो. लीला जेव्हा अभिरामला भेटेल, तेव्हा काय होणार हे बघण्याची मजाच वेगळी असणार आहे.
अभिनेत्री शर्मिला शिंदे जहागीरदार घराण्यातली मोठ्या सुनेची म्हणजेच दुर्गाची भूमिका साकारत आहे. शर्मिलाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, ‘दुर्गा मोठी सून असल्यामुळे आणि जहागीरदार घराण्यात सगळ्यात आधी आल्यामुळे तिचं अभिरामशी वेगळं नातं आहे. तिला अभिरामचा भूतकाळ माहितेय. दुर्गा शिस्तबद्ध तर आहेच, पण तिन्ही सुनांमध्ये हुशार, जबाबदार आणि व्यावहारिकही आहे.’
अभिनेत्री भुमीजा पाटील धाकट्या सुनेची भूमिका म्हणजे सरस्वती जहागीरदारची भूमिका साकारत आहे. भुमीजाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, ‘सरस्वती ही खूप लाडावलेली आहे. अचानक शिस्तबद्ध घराण्यात तिचं लग्न झालंय. सरस्वतीचं नवऱ्यावर अतिशय प्रेम आहे आणि तिला त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला आवडतायत. पण तिला त्यागोष्टी करायला जमत नाहीयेत. तिच्या निष्पाप स्वभावामुळे ती कठीण परिस्थितीतही असं काही बोलून जाते की, ती परिस्थिती विनोदी होऊन जाते.’
अभिनेत्री सानिका काशीकर मधल्या सुनेची म्हणजेच लक्ष्मी जहागीरदारची भूमिका साकारत आहे. सानिकाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, ‘लक्ष्मी ही एक धुर्त मुलगी आहे आणि तिला कळतं की, कुठे काय बोलायचं आणि कसं वागायचं. ज्या घराण्यात तिचं लग्न झालंय, तिला त्याचा हेवा आहे. तिला असं वाटतं की, घरात जे दुर्गाच स्थान आहे, ते तिला मिळावं आणि त्यासाठी तिची खटपट सुरु आहे. अशी आहे थोडी धांदरट पण हुशार लक्ष्मी, जहागीरदाराची मधली सून.’
संबंधित बातम्या