‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात लीला आधीच शूटिंगसाठी सेटवर पोहोचल्याची दिसत आहे. मात्र, शूटिंगच्या ठिकाणी पोहोचलेल्या लीलाला दिग्दर्शकाने चांगलाच धक्का दिला आहे. अभिराम सेटवर आला नाही तर, जाहिरातीचे शूटिंग तर होणार नाहीच, पण मी सेटला आग लावून टाकेन, असं म्हणत तो त्याच्या असिस्टंटच्या हातात रॉकेलचा कॅन घेऊन तिला लीलाच्या मागे मागे फिरायला लावत आहे. दुसरीकडे, दुर्गा अभिरामला जाहिरातीच्या शूटिंगसाठी तयार करण्यासाठी काही नवीन प्लॅन आखता येतोय का, याचा विचार करत असताना तिला आता एक नवीन कल्पना सुचणार आहे.
दुर्गा आता अभिरामच्या आईकडे म्हणजेच आजीकडे जाऊन तिला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर, आता आजी अभिरामला बोलवून जाहिरातीचे शूटिंग करण्यास सांगणार आहे. मात्र, अभिराम सुरुवातीला जाहिरातीसाठी नकार देणार आहे. मात्र, ‘ही जाहिरात एका निराधार मुलींच्या भविष्यासाठी असून, या निराधार मुलींना यातून खूप फायदा मिळणार आहे. त्यांनी बनवलेली उत्पादनांची ही जाहिरात तू केलीस, तर त्यातून येणारे पैसे हे सगळे त्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या आयुष्यासाठी खर्च होतील,’ असं म्हणून आजी त्याला जाहिरातीत काम करण्यासाठी तयार करताना दिसणार आहे.
तर, अशा चांगल्या कामासाठी मी कधीच नाही म्हणणार नाही, हे तुलाही माहितीये, असं म्हणून आता अभिराम जाहिरातीच्या शूटिंगला जायला तयार होणार आहे. दुसरीकडे, दुर्गाने देखील सुटकेचा निश्वास टाकलाय. दुर्गाच्या खोटेपणामुळे आता अभिराम जाहिरातीच्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचणार आहे. अभिरामला आलेला पाहून लीलाला चांगलीच भीती वाटत आहे. या जाहिरातीचे मुख्य अभिनेत्री मी आहे हे कळल्यावर अंकल मला मारूनच टाकतील, अशी भीती तिला वाटत आहे. त्यामुळे लीला सतत अभिरामपासून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
एकीकडे दिग्दर्शक अभिरामला मेकअप रूमकडे घेऊन जात असताना, दुसरीकडे लीला आधीच मेकअप करून सेटवर जाऊन पोहोचणार आहे. तर, आता अभिराम मेकअप करून साईटवर आल्यावर दिग्दर्शक अभिरामची ओळख लीलाशी करून देणार आहे. या आपल्या जाहिरातीच्या मुख्य अभिनेत्री आहेत, असं म्हणत तो लीलाला अभिरामशी भेटवणार तितक्यात लीला चेहऱ्याच्या समोर आरसा धरूनच उभी राहते. मात्र, दिग्दर्शकाच्या हट्टा पायी लीला आता चेहेऱ्यासमोरून आरसा बाजूला करणार आहे. आता अभिरामची प्रतिक्रिया काय असणार, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.