‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजचा भागात मोठा ड्रामा घडताना पाहायला मिळणार आहे. अभिरामने लीलाशी लग्न मोडलं असलं, तरी तिच्याकडून अंतराची अंगठी परत घेणे मात्र राहून गेला आहे. लीला आणि तिच्या कुटुंबांने अभिरामच्या कुटुंबाला सगळे दागिने परत केले. मात्र, भूलचुकीने अंतराची अंगठी लीलाच्या हातातच राहिली. आता अभिरामच्या हे लक्षात येणार आहे. अंतराची अंगठी अजूनही लीलाकडे आहे, ती कुणीच मागून घेतली नाही, हे कळल्यानंतर आता अभिराम प्रचंड संतापणार आहे. तर, तो ती अंगठी पुन्हा मिळवण्यासाठी लीलाकडे जाणार आहे.
अंतरांची अंगठी परत घेण्यासाठी अभिराम लीलाला सतत फोन करत राहतो. मात्र, लीला त्याचा फोन उचलणे टाळते. लीला फोन उचलत नसल्याने अभिरामच्या रागाचा पार आणखीनच वाढणार आहे. दुसरीकडे, लीला अभिरामला टाळत आहे. ‘आता या अंकलचं माझ्याकडे काय काम?’, असं म्हणत ती सतत अभिरामचा फोन कट करत आहे. इतक्यातच तिला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी फोन येतो. त्यामुळे आता लीला घरी खोटं बोलून या जाहिरातीच्या शूटिंगसाठी निघून जाणार आहे. तर, लीला शूटिंगसाठी गेल्यावर आता अभिराम तिच्या घरी येऊन धडकणार आहे.
अभिराम आपला निर्णय बदलून पुन्हा एकदा लीलाशी लग्न करायला आला आहे, असे वाटून कालिंदी त्याचा पाहुणचार करणार आहे. मात्र, अभिराम आपला निर्णय बदलणार नसल्याचे सांगत लीला कुठे आहे, अशी विचारणा करणार आहे. तर, लीलाच्या बाबांच्या फोनवरून तिला फोन करून सगळी परिस्थिती ऐकून, आता तो थेट लीला शूटिंग करत असलेला स्टुडिओ गाठणार आहे. लीलाचं शूटिंग अर्ध्यातच थांबवून अभिराम तिच्याकडून अंतराची अंगठी हिसकावून घेणार आहे.
अभिरामच्या अशा वागण्यामुळे लीलाच्या हातून हेही काम जाण्याच्या मार्गावर आहे. अभिरामशी लग्न मोडल्यानंतर आता साळुंके लीलाच्या मागे हात धुऊन लागला आहे. तो पुन्हा एकदा कर्जाचं कारण देऊन लीलाशी लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यावेळी लीला आणि रेवती यांनी मिळून साळुंकेला धमकी दिली आहे. ‘तुला तुझे पैसे ठरलेल्या वेळेत मिळतील, त्यामुळे पैसे मिळाले नाही तरच आमच्या घरात पाय ठेवायचा. अन्यथा आजूबाजूला दिसायचं देखील नाही’, अशी धमकी रेवती आणि लीला यांनी साळुंकेला दिली आहे. त्यामुळे आता या दोघी बहिणी खूप मेहनत करून आपल्या आई-वडिलांचं कर्ज फेडताना दिसणार आहेत.