‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात लीला आणि अभिराम यांचा लग्नसोहळा पार पडताना दिसणार आहे. अभिरामच्या तिन्ही सुना म्हणजेच दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या आपल्या होणाऱ्या सासूला म्हणजेच श्वेताला आणण्यासाठी तिच्या रूममध्ये पोहोचल्या होत्या. तोपर्यंत लीलाने बेशुद्ध श्वेताला बाथरूममध्ये ठेवून, तिची साडी आणि दागिने स्वतः घेऊन, आपला ड्रेस तिच्या अंगावर चढवून, ती स्वतः वधू वेशात तयार झाली होती. दुसरीकडे, अभिरामच्या सुना श्वेताच्या रूममध्ये आल्यावर त्यांना श्वेता तिथे दिसत नसल्यामुळे त्या चांगल्या गोंधळून गेल्या होत्या. अखेर बाथरूममध्ये त्यांना श्वेताच्या रूपात तयार झालेली लीला दिसली. मात्र, डोक्यावर पदर असल्याने त्या लीलाला ओळखू शकल्या नाहीत.
आता त्या लीलालाच श्वेता समजून बाहेर घेऊन आल्या आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी स्वतःच्या हाताने तिला दागिने देखील घातले आहेत. दुसरीकडे लीलाच्या मनात मात्र अपराधी भावना आहे. मात्र, लग्नाच्या मुहूर्ताची वेळ जवळ येत असल्याने आता त्या लोकांना मंडपात पोहोचावं लागणार आहे. डोक्यावर पदर घेतलेल्या लीलाला घेऊन अभिरामच्या तिन्ही सुना आता लग्न मंडपात पोहोचणार असून अभिरामसोबत लीलाचे सगळे लग्नविधी पार पडणार आहेत. नववधू आणि वर आता सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन लग्नाच्या पुढच्या विधींसाठी तयार होणार आहेत.
दुसरीकडे, श्वेताला शुद्ध येणार आहे. मात्र, तोपर्यंत अभिराम आणि लीलाचं लग्न पार पडणार आहे. आता सूनमुख बघण्याच्या विधीमध्ये अखेर नववधूच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला होणार असून, त्या मागील चेहरा समोर येणार आहे. श्वेता ऐवजी आपल्या पत्नीच्या रूपात लीलाला बघून आता अभिराम चांगलाच चिडणार आहे. दुसरीकडे, आजी मात्र लीलाला बघून खूप खुश होणार आहे. सगळ्याच लग्नविधी पार पडल्यामुळे आता लीलाच अभिरामची बायको म्हणून जहागीरदारांच्या घराचा उंबरठा ओलांडणार आहे.
घरात आल्यानंतर देखील अभिराम लीलावर खूप ओरडणार आहे. ‘तू माझी फसवणूक केलीस, मी तुझ्यावर विश्वास ठेवूनच चूक केली’, असं तो लीलाला म्हणणार आहे. मात्र, लीला त्याला सगळी खरी परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या बहिणीला म्हणजे रेवतीला कोणीतरी किडनॅप केलं होतं आणि तिला सुखरूप सोडण्याच्या बदल्यात मला तुमच्याशी लग्न करण्यास सांगितलं गेलं, अस ती अभिरामला सांगणार आहे. मात्र, अभिराम लीलाच्या या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीये. तो तिला ही गोष्ट सिद्ध करून दाखवायला सांगणार आहे. मालिकेत पुढे काय घडणार हे येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.