‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम लीलाला शोधण्यासाठी बाहेर पडताना दिसणार आहे. इथे जहागीरदारांच्या घरात सगळेच लोक लीलाला नावं ठेवत आहेत. तिला लग्न करायचं नव्हतं, तर कशाला तयार झाली आणि आता भर मेहंदी सोहळ्यात पाहुणे आलेले असताना अशी कशी घरातून पळून गेली? यातूनच घरातल्या लोकांचे संस्कार दिसतात. शेवटी सावत्र आई ही सावत्र आईच असते, असे बोलून काही लोक तिला टोमणे देताना दिसले आहेत. तर, आमची लीला असं करू शकत नाही, ती पळून गेलेली नाहीये, असं म्हणत कालिंदी सगळ्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करते.
दुसरीकडे लोकांसोबतच आता एजेच्या सुना म्हणजेच दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी यादेखील लीलाला नाव ठेवत आहेत. यामुळे आजीला मात्र धक्का बसला आहे. तर, घरात बसून नाव ठेवण्यापेक्षा लीलाला शोधलं पाहिजे, असं म्हणत आता तो तिला शोधण्यासाठी बाहेर पडला आहे. मात्र, अभिराम बाहेर जात असताना दुर्गा त्याला अडवणार आहे. तुम्ही लीलाला कुठे शोधणार? ती खूप लांब पळून गेली असेल, असं दुर्गा म्हणते. मात्र, अभिराम तिचं काहीही ऐकत नाही आणि आपली गाडी घेऊन सरळ निघून जातो. इकडे लीलाला शोधायला बाहेर पडलेला अभिराम कुणाला तरी फोन करतो आणि त्याने दिलेला मोबाईल नंबरचं लोकेशन विचारतो. तर, समोरचा माणूसही अभिरामला त्या मोबाईल नंबरचं लोकेशन सांगतो.
त्यानंतर अभिराम त्या लोकेशनवर पोहोचतो. इतक्यात त्याच्या तोंडावर लीलाचा दुपट्टा येऊन पडतो. इतका वेळ दुर्गाचीच लोकं असल्याचं समजून ज्यांच्यासोबत लीला इथवर आली होती, तेच लोक आता तिचा फायदा घ्यायला बघत होते. लीलाला किडनॅप करणाऱ्या माणसांनी तिला एका गोडाऊनमध्ये आणले. जिथे काही अज्ञात लोक आधीपासूनच दारू पीत जुगार खेळताना दिसतात. त्यांना पाहून लीला चांगलीच घाबरून गेली आहे. लीलाचा दुपट्टा पाहून, ती इथेच कुठेतरी असावी असावी, असं अभिरामला वाटतं. इतक्यात तो समोरच्या गोडाऊनचा दरवाजा उघडतो. तर, समोर त्याला काही गुंड लीलाला घेऊन उभे असलेले दिसतात.
आता या गुंडांच्या तावडीतून लीलाला सोडवण्यासाठी अभिराम प्रयत्न करत असतानाच लीला त्याचा हात खेचून आतल्या बाजूला घेऊन जाऊन दरवाजा लॉक करते. लीलाच्या या नको त्या हुशारपणामुळे आता अभिराम आणि लीला पुरते अडकले आहेत. यावेळी लीला आपण स्वतःहून पळून आलो, माला तुमच्याशी लग्नच करायचं नव्हतं, असं म्हणून प्लॅनवर पाणी फिरवणार आहे. लीला खरंच मेहंदी सोडून पळून गेली होती, हे आता अभिरामला कळले आहे. त्यामुळे चिडलेला अभिराम पुढे काय करणार?, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.