‘नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या आजच्या भागात लीला रेवतीचा जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसणार आहे. लीलाची लहान बहीण रेवती ही विक्रांत नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. सुरुवातीला लीलाने दोघांचं नातं मान्य केलं होतं. मात्र, आता लीलाने विक्रांतला एका दुसऱ्याच महिलेबरोबर पाहिलं. अधिक चौकशी केली असता, ती महिला विक्रांतची बायको असल्याचं लीलाच्या समोर आलं आहे. विक्रांत आधीच विवाहित असून, आपल्या बहिणीला म्हणजेच रेवतीला फसवत असल्याचे लीलाच्या लक्षात आले आहे. यानंतर लीलाने तडक घरी जाऊन रेवतीला याबद्दल सांगितलं. मात्र, विक्रांत आधीच लग्न झालं आहे, हे आपल्याला माहित आहे, असं रेवती तिला म्हणाली.
विक्रांत त्याच्या पत्नीबरोबर जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं आहे. लवकरच, तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार असून, आपल्यासोबत लग्न करणार असल्याचे रेवती लीलाला सांगते. मात्र, लीला रेवतीला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न करते. इतकंच नाही तर, विक्रांतच्या समोर जाऊन ती विक्रांतच्या कानाखाली जाळ काढते. यानंतर आता विक्रांत चांगला चिडला आहे. लीलाचा बदला घेण्यासाठी विक्रांत आता रेवतीला त्रास देणार आहे. तिला व्हिडीओ कॉल करून विक्रांत स्वतःचा जीव देत असल्याचा नाटक करतो. विक्रांतला जीव देताना पाहून भावनिक झालेली रेवती स्वतःच्या हाताची नस देखील कापून घेते. मात्र, लीला तातडीने तिला हॉस्पिटलला नेऊन, तिचा जीव वाचवते.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रेवतीला दाखल करून घेऊन, तिच्यावर उपचार सुरू करावेत, यासाठी अभिराम लीलाला मदत करतो. मात्र, याबद्दल लीला काहीही कल्पना नाही. तर, विक्रांतमुळे आपल्या बहिणीला खूप त्रास होतो, हे लक्षात आल्यावर आता लीला पोलिसांत धाव घेणार आहे. पण, पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या लीलाला मोठा धक्का बसणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेला पोलीस अधिकारी हा दुसरा-तिसरा कोणी नसून, खुद्द विक्रांतच आहे.
कसं आपण तुझ्या बहिणीला फसवलं, आपला हात न कापता देखील आपण तिला कसं जीव द्यायला भाग पाडलं आणि हा सगळा आपल्याच डाव होता, हे विक्रांत लीला समोर कबूल करणार आहे. मात्र, आता तुझ्या बहिणीला आणखी भोग भोगावे लागतील, असं म्हणत विक्रांत रेवती आणि लीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात करणार आहे. आता लीला विक्रांतचं हे खरं रूप रेवतीला कसं पटवून देईल? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.