‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. विक्रांत आणि कालिंदी यांच्या प्लॅनमुळे अभिरामची आई म्हणजे जहागीरदारांची आजी आता आजारी पडली आहे. आजीच्या मनात सतत अपराधीपणाची भावना येत आहे. आपल्या मुलाने म्हणजेच अभिरामने लीला नकार देऊन तिचा अपमान तर केलाच, मात्र यामुळे एका मुलीची बदनामी झाली, असं तिला सतत वाटत आहे. अर्थात हे विक्रांतनेच तिच्या मनात भरवलं आहे. त्यामुळे आता आजीला मोठा धक्का बसलाय आणि ती आजारी पडली आहे. डॉक्टरांना बोलावल्यानंतर डॉक्टरांनी आजीला औषध देऊन तात्पुरता आराम करायला सांगितला. मात्र, जोपर्यंत लीला येणार नाहीत, तोपर्यंत या ठीक होणार नाहीत, असं देखील डॉक्टर म्हणाले. कारण ग्लानीत असताना देखील आजी केवळ लीलाचं नाव घेत होत्या.
यामुळे आता लीलाला घरी आणावंच लागणार आहे. लीला जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मी काहीही खाणार आणि पिणार नाही, असा प्रण आजीने केला आहे. त्यामुळे आता अभिराम त्याच्या सुनांना लीलाला फोन लावण्यास सांगणार आहे. दुसरीकडे कालिंदी लीलाला घेऊन एका मंदिरात गेली आहे. देवाची पूजा केला की, अभिराम लीलाचा स्वीकार करेल आणि तिच्या आयुष्यात पुन्हा येईल, असं कालिंदीला वाटत आहे. त्यामुळे लीलाकडून ही पूजा करून घ्यायची, यासाठी खोटं आजारपणाचा नाटक करून ती लीलाला मंदिरात घेऊन गेली आहे.
दुसरीकडे, लीला दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यापैकी कुणाचाही फोन उचलत नाही. त्यामुळे अभिराम स्वतःच लीलाला फोन करतो. मात्र, लीला अभिरामचा फोन देखील उचलत नाही. त्यामुळे वैतागलेला अभिराम थेट गाडी घेऊन लीलाच्या घरी जातो. मात्र, लीलाच्या घराला टाळं लागलेलं पाहून, अभिराम अस्वस्थ होतो. इतक्यात बटर तिथे येतो. यावेळी अभिराम त्याला घरातील सगळी लोकं कुठे गेलेत?, असं विचारतो. त्यावर उत्तर देताना, लीलाताई आणि काकूसोबत जवळच्या मंदिरात गेल्यात, असं सांगतो. लीला मंदिरात आहे, हे ऐकल्यानंतर अभिराम तडक गाडी घेऊन मंदिरात पोहोचतो. त्यावेळी जप करत बसलेली लीला त्याला दिसते.
यावेळी तो लीलाला आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चल, असं म्हणतो. मात्र, लीला त्याच्याबरोबर घरी जाण्यास थेट नकार देते. ‘माझ्यासाठी नाही किमान आजीसाठी घरी चल, आई काहीच खात नाहीये आणि सारखं तुझंच नाव घेतेय. तिला बरं वाटावं म्हणून तरी घरी चल. एवढी एकच मागणी मी तुझ्याकडे करतोय’, असं म्हणून अभिराम तिला घरी चलण्यास सांगतो. मात्र, त्याच्याबरोबर गाडीतून घरी जाण्याऐवजी लीला रिक्षात बसून अभिरामच्या घरी पोहोचते. लीलाला बघून आजी खूप खुश होते. इतकंच नाही तर, सकाळपासून उपाशी असलेल्या आजीला लाली ज्यूस आणि नाश्ता देखील खाऊ घालते. यावेळी सगळ्यांना बाहेर पाठवून लीला आणि अभिरामला बोलवून आजी दोघांनाही एकमेकांशी लग्न करा, तुम्हाला माझी शपथ आहे, असं म्हणते. आता आजीने शपथ घातल्यामुळे लीला आणि अभिराम चांगलेच पेचात अडकले आहेत.