‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिरामची हळद आणि त्यात होणारा गोंधळ पाहायला मिळणार आहे. लीलाने जो डान्स ग्रुप जॉईन केला होता, नेमका त्या डान्स ग्रुपचा परफॉर्मन्स हा अभिरामच्या हळदीतच होणार होता. मात्र, या गोष्टीची कल्पना लीलाला अजिबातच नव्हती. इव्हेंटच्या ठिकाणी आल्यावर हे म्हणजे अभिरामचे घरच आहे, हे लक्षात आल्यावर लीला चांगलीच घाबरली होती. आपण इथे डान्स करू शकणार नाही, असं म्हणत तिने डान्स करण्यास नकारदेखील दिला होता. मात्र, तिच्या डान्स ग्रुप मॅनेजरने तिला कराराची आठवण करून देत, हा डान्स नाही केला तर लीलाला करार मोडल्या प्रकरणी तब्बल साडेतीन लाख रुपये कंपनीला द्यावे लागतील, अशी त्यात अट होती.
साळुंकेचे पैसे परत करायचे असल्यामुळे आणि आपल्या आई-वडिलांना कर्जातून बाहेर काढायचे असल्याने लीला अंगावर पडेल ते काम करून पैसा कमावण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यात तिने आपलं अभिनेत्री होण्याचं स्वप्न देखील पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिने एक डान्स ग्रुप जॉईन केला होता. योगायोगाने हा डान्स ग्रुप नेमका अभिरामच्या हळदीतच पोहोचला आणि लीलाच्या आयुष्यात नवा गोंधळच निर्माण झाला. कसंही झालं तरी हा डान्स करावाच लागणार हे लक्षात आल्यावर लीलाने तोंडावर मास्क बांधून एका हटके अवतारात अभिरामच्या हळदीच्या सोहळ्यात नृत्य सादर केलं.
लीलाच्या डान्समुळे अभिराम जहागीरदारच्या घरातील सगळीच मंडळी खुश झाली आणि बक्षीस देण्यासाठी आजी आणि अभिरामच्या सुनांनी सगळ्यांनाच जवळ बोलवलं. यावेळी सगळ्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचे मास्क काढायला सांगितले. मात्र, लीलाने मास्क काढण्यास नकार दिला. काहीही न बोलता लीला तिथून पळणार इतक्यात अभिराम तिथे आला पळणाऱ्या लीलाचा पाय अडकून ती थेट अभिरामच्या कवेत जाऊन पडली. तिला सावरताना अभिरामच्या लक्षात आलं की, ही लीलाच आहे आणि त्याने लीलाच्या चेहऱ्यावरचा तो मास्क बाजूला केला. हळदी सोहळ्यात लीलाला पाहून सगळेच दंग झाले होते. कुणीही काही बोलणार इतक्यात हळदीचा बार फुटला आणि सगळी हळद अभिराम आणि लीलावर एकत्र उधळली गेली.
हळदीचे हे दृश्य पाहून गुरुजी देखील म्हणाले की, ‘काय हा योगायोग आहे, अभिरामच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. अखेर अभिरामच्या नावाची हळद आता लीलालाच लागलेली आहे.’ हे ऐकल्यानंतर अभिरामचा पारा चांगला चढला होता. मात्र, अभिरामने काहीही बोलणं टाळलं. एकीकडे लीलाला आपली यात काही चुक नसल्याचे समजावत होती. तर, लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती यांनी मात्र लीलावर चांगलंच तोंडसुख घेतलं. आता अभिराम काय निर्णय घेणार? कुणाशी लग्न करणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.