Navra Mazha Navsacha 2 Set Video: मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा.' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता प्रदर्शनाला २० वर्षे उलटल्यानंतर चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून सेटवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाच्या शुटींगचा एक व्हिडिओ दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये सचिन पिळगावकर यांच्यासह अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली सागर दिसत आहेत. त्यांचा सेटवरचा मजेशीर व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा: विक्रांत मेस्सीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; 12th Fail फेम अभिनेत्याने केली पोस्ट
राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, वैभव मांगले, निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, हेमल इंगळे, संतोष पवार आणि अली असगर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सचिन पिळगावकर यांनी केली आहे. लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.
'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? चित्रपटाचे कथानक काय असणार? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली होती. त्यामध्ये चला ना गडे, हिरवा निसर्ग हा भवतीने, चला जेजुरीला जाऊ, वेदशास्त्रामाजी हो मंगलमूर्ती या गाण्यांचा सहभाग आहे. या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.