मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा.' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता प्रदर्शनाला २० वर्षे उलटल्यानंतर चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.
एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. नुकतेच मुंबई येथील श्री. सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते.
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय "नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता "नवरा माझा नवसाचा 2"मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणाच असल्याची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. "'नवरा माझा नवसाचा २'शुटिंगला उद्यापासून सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच राहुद्या" या आशयाचे कॅप्शन त्यांनी सोशल मीडियावर दिले.
"नवरा माझा नवसाचा" हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता "नवरा माझा नवसाचा 2" मध्ये नक्की काय घडते ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो यासाठी अजुन रसिक प्रेक्षकांना थोडी वाट पहायला लागणार आहे.
वाचा: 'धर्मवीर २' चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?
'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली होती. त्यामध्ये चला ना गडे, हिरवा निसर्ग हा भवतीने, चला जेजुरीला जाऊ, वेदशास्त्रामाजी हो मंगलमूर्ती या गाण्यांचा सहभाग आहे. या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.