लाल बस दिसली की आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांसमोर अशोक सराफ यांचा चेहरा येतो. यामागचं कारण म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात गणपतीपुळ्याला जाणाऱ्या ‘व्हर्जिनल गाडीचा व्हर्जिनल कंडक्टर’ बनून त्यांनी प्रेक्षकांचे भापूर मनोरंजन केले होते. आता जवळपास १९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटातील भारूड सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील भारूड प्रदर्शनाच्या एक दिवस आधी प्रदर्शित झाले आहे. हे भारूड राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे भारूड ट्रेनमध्ये शूट करण्यात आले आहे. या भारूडामध्ये सिद्धार्थ जाधव, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी हे कलाकार उभे असल्याचे दिसत आहे. या भारूडामध्ये सिद्धार्थ जाधव हा गणपतीला साकडं घालताना दिसत आहेत. हे साकडं घालत असताना 'नवस बोलतायेत की लाच देतायेत' असे स्वप्नील जोशी बोलताना दिसत आहे.
शुक्रवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’च्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे ९९ रुपयांमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळाले. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, ‘नवरा माझा नवसाचा २’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृत आकडेवारी शेअर केलेली नाही.
वाचा: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर झोपले अन्...; जाणून घ्या महेश भट्ट यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे, गणेश पवार असे अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते लिलीपुट यांनीही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.