मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा.' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता तब्बल २० वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. आता या चित्रपटाने किती कमाई केली चला जाणून घेऊया...
"नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६०० पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. त्यामुळे चित्रपटाने चांगलीच कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटालाही टक्कर दिली आहे. विकेंडला या चित्रपटाने ७.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटात एक वेगळी कथा पाहायला मिळाली. एसटी बसने सुरु झालेला प्रवास आता ट्रेनवर येऊन पोहोचला आहे. सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी हे नवस फोडण्यासाठी यावेळी ट्रेनने जात असतात. त्यांच्या ट्रेनच्या प्रवास येणारे अडथळे आणि धमाल पाहायला प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. त्याशिवाय "नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता "नवरा माझा नवसाचा 2"मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत. येत्या काळात या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. बॉलिवूड चित्रपटांनाही हा चित्रपट टक्कर देताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.