आज १६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. ही नावे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केली आहे. २०२२-२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. चित्रपटसृष्टी दरवर्षी या पुरस्काराची वाट पाहत असते. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कारही सिनेप्रेमींसाठी खूप महत्त्वाचे असतात. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आणि कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला हे जाहीर करण्यात आले. पण या विजेत्यांना किती रक्कम मिळाली याची चर्चा जास्त सुरु आहे.
कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 'कांतारा' या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रजत कमळ आणि दोन लाख रुपये असे असणार आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दोन अभिनेत्रींमध्ये विभागला गेला आहे. 'तिरुचित्रांबलम' या तमिळ चित्रपटासाठी अभिनेत्री नित्या मेननला आणि 'कच्छ एक्स्प्रेस' या गुजराती चित्रपटासाठी अभिनेत्री मानसी पारेखला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यासाठी दोघींमध्ये रजत कमळ आणि दोन लाख रुपये बक्षिसाची रक्कम विभाजित केली जाणार आहे.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार 'गुलमोहर' या चित्रपटाला जाहीर करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते स्टार इंडिया प्रायव्हेड लिमिटेड आणि दिग्दर्शक राहुल चित्तेला यांना प्रत्येकी २ लाख रुपये व रजत कमळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 'वाळवी' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे निर्माते मायासभा करमणूक मंडळी, झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांना प्रत्येकी २ लाख रुपये व मानचिन्ह म्हणून रजत कमळ मिळणार आहे.
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागातील विजेत्यांना स्वर्णकमळ आणि प्रत्येकी ३ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
वाचा: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू
७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पुरस्कार विजेत्यांची यादी जाहिर करण्यात आली. यंदा दाक्षिणात्य चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाळवी चित्रपटाला मिळाला आहे.