'माया दर्पण' आणि 'तरंग' सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन झाले आहे. त्यांना समांतर सिनेमांचे प्रणेते मानले जाते. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुमार साहनी यांनी 'माया दर्पण', 'तरंग', 'ख्याल गाथा' आणि 'कसबा' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. दिग्दर्शकासोबतच कुमार साहनी यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
कुमार साहनी यांचा जन्म ७ डिसेंबर १९४० रोजी लारकाना येथे झाला होता. त्यांच्यावर पासोलिनी आणि तारकोव्स्की सारख्या महान व्यक्तीमत्वांचा प्रभाव होता. कथा सांगण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीने त्यांना वेगळी ओळख मिळाली. दिग्दर्शक असण्यासोबतच ते शिक्षक आणि लेखकही होते. त्यांनी 'द शॉक ऑफ डिझायर अँड अदर एसेस' सारखे पुस्तक लिहिले आहे.
कुमार साहनी यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये शिक्षण घेतले. यांनतर ते फ्रान्सला गेले आणि चित्रपट निर्माते रॉबर्ट ब्रेसन यांना त्यांचा 'उने डेम डूस' चित्रपट बनवण्यात मदत केली.
कुमार सहान यांनी निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित 'माया दर्पण' बनवला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कॅटेगरीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कुमार यांनी 'तरंग', 'ख्याल गाथा', 'कसबा' आणि 'चार अध्याय' यासह अनेक समांतर चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.
कुमार साहनी यांनी केवळ राष्ट्रीय पुरस्कारच जिंकले नाहीत तर त्यांनी वेगवेगळ्या वेळी ३ फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले. १९७३ मध्ये रिलीज झालेल्या 'माया दर्पण', १९९० मध्ये रिलीज झालेल्या 'ख्याल गाथा' आणि १९९१ मध्ये रिलीज झालेल्या 'कसबा' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. २००४ नंतर त्यांनी चित्रपट बनवणे सोडून लेखन आणि अध्यापन सुरू केले होते.
संबंधित बातम्या