
मराठीच नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला दबदबा निर्माण करणारे अभिनेते नाना पाटेकर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा 'ओले आले' हा हटके मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा आहे. आता या चित्रपटाच्या निमित्ताने नाना पाटेकर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
नुकताच नाना पाटेकर यांनी 'झी २४ तास'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना 'महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय कुटुंबांना सुरुवातीपासून एकत्र आणि जवळून पाहिल्यानंतर सद्य राजकीय स्थितीत त्या कुटुंबांचे विभाजन होताना पाहून काय वाटले?' असा प्रश्न विचारला होता. त्यावर नाना पाटेकरांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: सलमानने घेतली अभिषेक आणि बिग बींची गळा भेट, व्हिडीओपाहून नेटकरी झाले चकीत
“वाईट वाटले…कारण, बाळासाहेबांमुळे माझे त्या घरातील सगळ्याच मंडळींशी एक छान नाते होते. बिंदाबरोबर मी ‘अग्निसाक्षी’ नावाचा सिनेमाही केला होता. त्या चित्रपटाची निर्मिती त्याने केली होती. जयदेव, उद्धव, राज या सगळ्यांशी छान नाते होते. पण, सगळ्यागोष्टी विस्कळीत झाल्या आणि शिवसेना म्हणून मी कोणाकडे पाहायचे असा प्रश्न निर्माण झाला” असे नाना म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “बाळासाहेब मला आवर्जून फोन करून काय रे गाढवा काय करतोय…येऊन जा रे असे सांगायचे. त्यांच्याकडून तो एक फोन येणे हे आमच्यातील नाते होते. ते गेल्यावर मला कोणाचेही फोन आले नाहीत. राज, उद्धवबरोबर सुद्धा माझे असेच नाते होते…ते आता बंद झाले. माझा कोणावरही राग नाही त्यांचाही माझ्यावर नसेल. पण, तिकडे मला आता अरे गाढवा येतोस की नाही असे बोलणारे कोणी नाही राहिले. बाळासाहेब गेले आणि माझा मातोश्रीशी संबंध संपला. आधीसारखे नाते आता नाही राहिले.”
संबंधित बातम्या
