Happy Birthday Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असेच एक नाव आहे, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. १ जानेवारी १९५१ रोजी जन्मलेले विश्वनाथ पाटेकर हे मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर म्हणून ओळखले जात होते. त्यांचे संवाद आणि त्यांनी पडद्यावर साकारलेली पात्र लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी...
नाना पाटेकर आज भलेही दिग्गज अभिनेते असतील, पण त्यांनी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला होता. बालपण गरिबीत घालवलेल्या नाना पाटेकर यांनी वयाच्या १३व्या वर्षी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते आठ किलोमीटर पायपीट करून चुन्याच्या भट्टीत काम करायला जायचे. दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून तिथे ते चित्रपटाची पोस्टर्स रंगवण्याचे काम करायचे.
चार दशकांपासून चित्रपट जगतात सक्रिय असलेल्या नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाचे सर्व रंग प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. गंभीर व्यक्तिरेखा असो वा कॉमिक, रोमँटिक असो की नकारात्मक, त्यांनी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली. १९७८मध्ये आलेल्या 'गमन' चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांना 'परिंदा' चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.
नाना पाटेकर हे एक असे अभिनेते आहेत, जे आपल्या प्रत्येक चित्रपटावर आपली मोहर उमटवतात. त्यांची बोलण्याची शैली लोकांना खूप आवडते. चित्रपटातील त्यांचे एकपात्री संवादही लोकांना खूप आवडतात. नानांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चार फिल्मफेअर आणि तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत. नाना पाटेकर यांचे लग्न थिएटर आर्टिस्ट नीलू उर्फ नीलकांती यांच्यासोबत झाले आहे. दोघांना एक मुलगा देखील आहे. मात्र, आता ही जोडी एकमेकांसोबत राहत नाही. दोघांचा घटस्फोट झालेला नाही, पण ते एकत्र राहत नाहीत.
नाना पाटेकर यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे ते संजय दत्तसोबत कधीही काम करत नाहीत. पण यामागे खूप मोठे कारण दडलेले आहे. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत स्फोट झाला होता. या मालिका बॉम्बस्फोटात संजय दत्त दोषी आढळला होता. त्याचवेळी या स्फोटात नाना पाटेकर यांनी आपला भाऊ गमावला. अशाच एका मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले होते की, ते यासाठी संजय दत्तला कधीच माफ करू शकणार नाहीत. १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तने शिक्षा भोगली असली, तरी त्यांनी कधीही त्याच्यासोबत काम करणार नसल्याची शपथ घेतली होती.
संबंधित बातम्या