Namrata Shirodkar Birthday : हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर आज (२२ जानेवारी) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही, तर तिच्या प्रेमकथेमुळेही चर्चेत राहिली. तिचा पती महेश बाबू हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील मोठा सुपरस्टार आहे. आज नम्रताच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर नम्रता शिरोडकरने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. १९९८ मध्ये तिने सलमान खान आणि ट्विंकल खन्नासोबत हिंदी चित्रपटांमध्ये प्रवेश केला. या चित्रपटाचे नाव होते 'जब प्यार किसी से होता है'. मात्र, तिला खरी ओळख साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून मिळाली. तिने १९९९ मध्ये तिचा पहिला तेलुगू चित्रपट 'वामसी' साइन केला होता. या चित्रपटादरम्यानच तिची भेट साऊथ सुपरस्टार महेश बाबू याच्याशी झाली. तो या चित्रपटाचा नायक होता. ही भेट केवळ चित्रपट प्रवासाचीच नाही, तर त्यांच्या नात्याचीही सुरुवात होती.
नम्रता आणि महेश बाबू यांची पहिली भेट २००० मध्ये 'वामसी' चित्रपटाच्या मुहूर्तावर झाली होती. ही भेट छोटी असली तरी त्याचा दोघांवर खोलवर परिणाम झाला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही सुरुवातीला आपले नाते गुपित ठेवले होते, पण एके दिवशी महेशच्या बहिणीला ही प्रेमकहाणी कळली. यानंतर, २००४ मध्ये या जोडप्याने त्यांचे नाते सार्वजनिकरित्या जाहीर केले आणि १० फेब्रुवारी २००५ रोजी त्यांनी लग्न केले.
लग्नानंतर नम्रता अभिनयापासून पूर्णपणे दूर गेली. तिचा पाती महेश बाबू याची इच्छा होती की, त्याच्या पत्नीने अभिनयाच्या दुनियेत सक्रिय न राहता कुटुंबावर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याच्या इच्छेला मान देत नम्रतानेही तिच्या फिल्मी करिअरला अलविदा केला.
आता नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू दोन मुलांचे पालक आहेत. ती एक मुलगा आणि एका मुलीची आई आहे. नम्रता शिरोडकरने नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले आहे. ती आता अभिनय करत नसली तरी, सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा मुलांसोबत फोटो शेअर करत असते. याशिवाय नम्रता सध्या चित्रपट निर्माती म्हणून सक्रिय आहे. तिने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेजर' चित्रपटाची निर्मिती केली होती.
संबंधित बातम्या