
Namrata Sambherao Quit KURRR Marathi Natak: मराठी नाट्यविश्वातील सध्या गाजत असलेलं 'कुर्रर्रर्र' हे नाटक सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलं आहे. या नाटकात नुकतेच काही महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत. 'कुर्रर्रर्र' या नाटकातील दोन कलाकारांनी नाटक सोडल्याने त्यांच्याजागी दोन नवे कलाकार आले आहेत. मात्र, प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांनी हे नाटक का सोडलं यामागचं कारण मात्र गुलदस्त्यात होतं. आता अभिनेत्री नम्रता संभेराव हिने अखेर 'कुर्रर्रर्र' हे नाटक का सोडलं या मागचं कारण सांगितलं आहे. नम्रताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने हे कारण स्पष्ट केले आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव ही 'कुर्रर्रर्र' या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. मात्र, काहीच दिवसांपूर्वी तिने या नाटकाला रामराम ठोकला आहे. यावर बोलताना तिने लिहिले की, 'कुर्रर्रर्र या नाटकातली माझी भूमिका पूजा मला तुझी नेहमीच आठवण येईल. पण, शो मस्ट गो ऑन...
माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक. माझी भूमिका मी अक्षरशः जगले. माझ्या आयुष्यातलं अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस याच नाटकाने मिळवून दिलं मला. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, प्रेम केलं. अत्यंत व्यस्त शेड्युलमधून आम्ही कुर्रर्रर्र या नाटकाचे २ वर्षात २००हुन अधिक प्रयोग केले. पण, व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली.'
पुढे नम्रता संभेरावने लिहिले की, 'बॅकस्टेज आणि सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावे, यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो पहिल्यांदा अनुभवला. पण, हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे. नाटकासाठीच घेतला आहे आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्वीकार कराल, अशी खात्री आहे. यापूर्वी जसं प्रेम केलंत, तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या कुर्रर्रर्र या नाटकाच्या नवीन संचावर कराल, अशी अशा आहे. मी अजूनही आमच्या म्हणतेय कारण शारीरिक रित्या एक्झिट घेतली, तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेलेय, तिथून कधीच एक्झिट होत नसते. माझ्या शुभेच्छा कायम सोबत असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई, विनोदाचा बाप पॅडी दादा, माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि सुप्रीम प्रियदर्शन दादा तुम्हाला व 'कुर्रर्रर्र'च्या सर्व टीमला पुढील प्रयोगांसाठी हाऊसफुल शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही. भेटू लवकरच ...'
अभिनेत्री नम्रता संभेरावच्या या पोस्टमुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, वेळेच्या कारणामुळेच तिने या नाटकातून काढता पाय घेतला आहे. यानंतर आता चाहते पुन्हा तिला नाटकांत पाहण्याची आशा व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या
