दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा 'कुशी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विजय हा 'बिग बॉस तेलुगू ७'मध्ये पोहोचला होता. त्यावेळी या शोचा सूत्रसंचालक नागार्जुनने पूर्वाश्रमीची सून समांथा रुथ प्रभूविषयी विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन 'बिग बॉस तेलुगू ७'चे सूत्रसंचालन करत आहे. नागार्जुन यांचा मुलगा नाग चैतन्यशी समंथाने लग्न केले होते. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. आता पूर्व सुनेच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलेल्या अभिनेत्याला विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले.
वाचा: करीनाला सिनेमातून काढून टाकले होते; अमिषा पटेलचा 'कहो ना प्यार'बाबत मोठा खुलासा
३ सप्टेंबर रोजी 'बिग बॉस तेलुगू'चा सिझन ७ सुरु झाला. या शोमध्ये विजयने कुशी चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. त्याचा डान्स संपताच सूत्रसंचालक नागार्जुन मंचावर येतो आणि समांथा विषयी विचारतो. ‘तुझी हिरोइन कुठंय, समंथा?’ असा प्रश्न नागार्जुनने विजयला विचारला. तो प्रश्न ऐकल्यावर चाहते देखील चकीत झाले आहेत. “ती भारतात परत येताच आमच्यासोबत मिळून प्रमोशन करेल अशी अपेक्षा आहे” असे विजय म्हणाला.
समांथा आणि नागार्जुनचा मुलगा चैतन्यने २०२१मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या चार वर्षातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असे ती म्हणाली होती.