Happy Birthday Nagarjuna Akkineni: टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता नागार्जुन अक्किनेनी यांचा आज ६५वा वाढदिवस आहे. या अभिनेत्याचा जन्म २९ ऑगस्ट १९५९ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. नागार्जुनचे वडील प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांचे नाव अक्किनेनी नागेश्वर राव आहे. नागार्जुन अक्किनेनी याने आपले शालेय शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आंतररत्न कनिष्ठ महाविद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याच वेळी, त्याने चेन्नईच्या गिंडी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली.
नागार्जुनला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. नागार्जुनने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तो १९८६मध्ये आलेल्या तेलुगू चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून दिसला. त्याने मनोरंजन विश्वात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘मनमधुडू’, ‘मास’, ‘डॉन नंबर वन’, ‘किलर’, ‘किराई दादा’, ‘किंग नंबर वन’ आणि ‘मनम’ यांसारखे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. अभिनेता नागार्जुन त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे तर चर्चेत आहेच, मात्र त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे.
नागार्जुनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याने १९८४मध्ये लक्ष्मी दग्गुबातीसोबत पहिले लग्न केले होते. परंतु, १९९०मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या दोन वर्षानंतर, अभिनेत्याने १९९२मध्ये अभिनेत्री अमलाशी दुसरे लग्न केले. दोघांनाही नागा चैतन्य आणि अखिल अक्किनेनी ही दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुलँ देखील आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहेत.
नागार्जुनच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर, अफेअरमुळे चर्चेत आला होता. आधीच दोनदा संसार थाटून झाल्यानंतर देखील नागार्जुन बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून, तब्बू होती. विवाहित असतानादेखील नागार्जुन तब्बूच्या प्रेमात पडला होता. जेव्हा त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली, तेव्हा त्यांच्या नात्याची चर्चा अधिक तीव्र झाली. दोघेही १० वर्षे एकमेकांना डेट करत होते.
तब्बू आणि नागार्जुन १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचा दावाही त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये करण्यात आला होता. दोघेही लग्न करतील असे चाहत्यांना वाटत होते. मात्र, नागार्जुन आपली पत्नी अमलाला सोडण्यास तयार नव्हता. यामुळे तब्बू आणि नागार्जुन यांच्या नात्यात वितुष्ट आले आणि नंतर दोघे वेगळे झाले. मात्र, तब्बू किंवा नागार्जुन दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधी काहीही जाहीरपणे सांगितले नव्हते. विशेष म्हणजे आज वयाच्या ५२व्या वर्षीही तब्बू सिंगल राहत आहे. तिने अजून लग्न केलेले नाही.