परेश मोकाशींनी 'वाळवी' चित्रपटातून सर्वांना दखल घ्यायला भाग पाडल्यानंतर आता त्यांचा नाच ग घुमा हा नवा कोरा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चे नवीन मोशन पोस्टर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशित करण्यात आले.
हे पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मुक्ता आणि नम्रता यांच्या जोडीला सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार चित्रपटात असल्याने ‘नाच गं घुमा’ नेमका काय व कसा असेल, याची कल्पना रसिकांना होती. मात्र पोस्टरवरील ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते,’ ‘प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते,’ अशी घोषवाक्ये रसिकांची उत्कंठा आणखीन वाढवतात.
आघाडीच्या कलाकारांबरोबर दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी, लेखक म्हणून मधुगंधा कुलकर्णी-परेश मोकाशी आणि निर्माते म्हणून मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील ही नावे जोडली गेली असल्याने, काहीतरी भन्नाट आपल्यासमोर येणार याची खूणगाठ प्रेक्षक बांधून टाकतो. प्रत्येक गृहिणी तिच्या घराची ‘राणी’ त्याचवेळी बनू शकते जेव्हा तिची कामवाली तिच्यासाठी ‘परीराणी’ होते. या पोस्टरमधूनही हीच संकल्पना सामोर येते. मुक्ता बर्वे राणीच्या वेशात आहे तर तिची कामवाली बनलेली नम्रता परीराणीच्या वेशात. म्हणजे दोघींमध्ये राणी आणि परीराणीचे नाते आहे. त्यातून पुढे काय धमाल करमणूक होते, ती अनुभवण्यासाठी रसिकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागणार आहे,”
स्वप्नील जोशी म्हणतात. ‘नारी ग साजरी बाई तू गोजरी, हातांनी पेलशी संसार सारा घुमा...’अशा आशयाचे एक गाणे या पोस्टरवर झळकते आणि कर्णमधुर संगीताची हमी देवून जाते. स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मुल सांभाळताना तिला अजून दोन हातांची मदत लागते आणि हे दोन हात असतात मोलकरणीचे. मालकीण-मोलकरीण यांचे सूर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी! या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या-आमच्या घरातील, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचे घर सांभाळून आपले घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन म्हणजे ‘नाच गं घुमा’. दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून आता सगळ्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. “महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. बायकांच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर, गमती-जमतींवर चित्रपट बेतला आहे,” ते म्हणतात.
चित्रपट कसा आकाराला आला हे सांगताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “सहज म्हणून आम्ही शर्मिष्ठा, तेजस आणि स्वप्नील यांना या कथेच्या वाचनासाठी बोलावले. हसून हसून हैराण झाले ते. आमची मैत्रीण तृप्ती पाटील हिने ही त्यात उडी मारली. सहज वाचनासाठी जमलेला हा संच, तितक्याच सहजपणे आणि झटक्यात निर्मात्यांचा समूह बनला.” निर्मात्या शर्मिष्ठा राऊत म्हणाल्या, “आम्ही जेवढी कल्पना केली होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मजा, चित्रपट करताना आम्हाला आली. एका वेगळ्या विषयावरील हा चित्रपट तेवढ्याच कुशलतेने दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी हाताळला असून, त्याला चित्रपटातील दिग्गज कलाकारंनी तेवढाच हातभार लावला आहे. मधुगंधा, परेश, स्वप्नील या मंडळींचा नुकताच आलेला ‘वाळवी’ चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजला आणि लोकप्रिय झाला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि व चि सौ कां, आत्मपॅम्प्लेट, वाळवी यांसारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या टीमची ही पुढील प्रस्तुती आहे.
संबंधित बातम्या