बॉलिवूड अभिनेता परवीन डबासचा आज सकाळी अपघात झाला. अभिनेता रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेता सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या सर्व आरोग्य चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात त्याच्यासोबत त्याची पत्नी प्रीती झांगियानी देखील आहे. अभिनेत्याला मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अभिनेता परवीन डबास हा प्रो पंजा लीगचा को-फाऊंडर आहे. प्रो पंजा लीगकडून अभिनेत्याच्या कार अपघाताची माहिती देण्यात आली आहे. 'प्रो पंजा लीगचे सहसंस्थापक परवीन डबास यांचा शनिवारी सकाळी कार अपघात झाला आणि त्यांना वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटल, आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताशी संबंधित माहिती समोर येत आहे. सध्या परवीन यांच्यावर उपचार सुरु आहेत' या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.
पुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, 'या कठीण कळाता आम्ही परवीन डबास यांच्या आणि कुटुंबासोबत आहोत. प्रो पंजा लीगची टीम परवीन यांची योग्य ती काळजी घेत आहे. तसेच त्यांच्या प्रकृती संबंधी माहिती आम्ही तुम्हाला देत राहू.' तसेच त्यांनी पोस्टमध्ये पुढे चाहत्यांना विनंती केली आहे की या कठीण काळात परवीन डबास आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या गोपनियतेची काळजी घेतली जावी. तसेच चाहते देखील परवीन लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.
वाचा: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर झोपले अन्...; जाणून घ्या महेश भट्ट यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं
परवीन डबासच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या खोसला का घोसला या चित्रपटात दिसला होता. माय नेम इज खान, रागिनी एमएमएस 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला होता. तर परवीन डबास प्राइम व्हिडिओच्या मेड इन हेवन या सीरिजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने २००८मध्ये प्रीती झांगियानीसोबत लग्न केले. आता त्याचा अपघात झाल्यानंतर सर्वजण तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.