मुंबईत रंगणार 'क्लासिकल पंचम' मैफल; आर डी बर्मन यांचा वेगळा सांगितीक पैलू उलगडणार-music concert on r d burmans classical songs to be held in mumbai on sunday 11 august ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुंबईत रंगणार 'क्लासिकल पंचम' मैफल; आर डी बर्मन यांचा वेगळा सांगितीक पैलू उलगडणार

मुंबईत रंगणार 'क्लासिकल पंचम' मैफल; आर डी बर्मन यांचा वेगळा सांगितीक पैलू उलगडणार

Aug 03, 2024 07:54 PM IST

Classical Pancham : मुंबईतील विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात ११ ऑगस्ट रोजी क्लासिकल पंचम ही सांगितीक मैफल रंगणार आहे.

मुंबईत रंगणार 'क्लासिकल पंचम' मैफल; आर डी बर्मन यांचा वेगळा सांगितीक पैलू उलगडणार
मुंबईत रंगणार 'क्लासिकल पंचम' मैफल; आर डी बर्मन यांचा वेगळा सांगितीक पैलू उलगडणार

Classical Pancham : आर. डी. बर्मन तथा पंचमदा म्हणजे अजरामर सुरावटींचे जादूगार. पंचमदा हे हिंदी सिनेसंगीताला पडलेलं एक सुरेल स्वप्न होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांची गाणी कधीच न गुणगुणलेला संगीतरसिक विरळाच. मात्र, संगीत क्षेत्रातील या हिऱ्याचे सर्व पैलू सर्वांना माहीत असतीलच असं नाही. त्यापैकी एक पैलू म्हणजे पंचमदांचं शास्त्रीय संगीताशी असलेलं नातं.

पंचमदांचा हा अनोखा पैलू जाणून घेण्याची संधी मुंबईकर संगीत रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे स्वरदा कम्युनिकेशन्स अँड इव्हेंट्सनं ग्लिटराटी इंटरटेन्मेंटच्या सहयोगानं आयोजित केलेल्या 'क्लासिकल पंचम' या सांगितीक मैफलीचं. येत्या ११ ऑगस्ट रोजी, रविवारी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता ही स्वरमैफल रंगणार आहे.

आर डी बर्मन यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित अनेक संगीत रचना केल्या. त्यात 'रैना बिती जाये', 'बिती ना बिताई रैना', 'बडा नटखट है' पासून 'झुटे तेरे नैन', 'सातों बार बोले बन्सी' अशी अनेक गाणी आहेत. ही गाणी 'क्लासिकल पंचम' या मैफलीत सादर केली जातील.

प्रसिद्ध गायिका शैलजा सुब्रमणियन या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेली पंचमदांची गाणी सादर करतील. तर, 'चिंगारी कोई भडके', 'कुछ तो लोग कहेंगे' ही किशोर कुमार यांच्या आवाजातील गाणी लोकप्रिय गायक चेतन राणा सादर करतील. गायिका ईशानी पाटणकर या कार्यक्रमात पंचमदांची काही वेगळ्या धाटणीची गाणी चाकोरी बाहेरील गाणी सादर करेल.

कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सी. विद्याधर यांचं असून निर्माते शैलेश पेठे आणि कार्यकारी निर्माते अनिल परिख आहेत. तुंबा वादक अनुपम घटक आणि विख्यात की-बोर्ड वादक चिराग पांचाळ हे संगीत संयोजक आहेत. प्रसिद्ध निवेदक संदीप पंचवटकर हे निवेदन करणार असून या निवेदनाला पंचमदांच्या कारकीर्तील अनेक किश्श्यांची जोड असेल. अरविंद मेहता आणि प्रतीक मेहता यांचं सहकार्य लाभलं आहे. अधिक माहितीसाठी ९८२०२४०५९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

विभाग