माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय विश्वासह बॉलिवूडलाही धक्का बसला. त्यांच्या हत्येची पूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने घेतली. आता बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हेतूशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचेही नाव त्याच्या हिटलिस्टमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात आलेल्या मुनव्वरच्या मागे बिश्नोई टोळीचे दोन शूटर होते. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्तमाहितीनंतर त्यांचा हेतू पूर्ण होऊ शकला नाही.
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर पोलीस बिश्नोई टोळीच्या नेटवर्कचा तपास करत आहेत. दरम्यान, सलमान खानव्यतिरिक्त मुनव्वर फारुकीसह अनेक नेते आणि सेलेब्सचीही हिटलिस्टमध्ये नावे असल्याचे वृत्त आहे. टाइम्स नाऊया वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर महिन्यात कॉमेडियन मुनव्वर फारुकी बिश्नोई टोळीचे लक्ष्य असून बचावला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो मुंबईहून दिल्लीला आला होता. मुनव्वर ज्या विमानात होता, त्या विमानात लॉरेन्स बिश्नोईचे दोन शूटर होते. दिल्ली पोलिसांचे पथक आधीपासूनच त्या शूटर्सचा शोध घेत होते कारण त्यांनी दिल्लीतील एका व्यावसायिकाचीही हत्या केली होती.
त्यामुळे हल्लेखोर हॉटेलमध्ये असल्याची बातमी दिल्ली पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. यापूर्वी मुनव्वर फारुकीला धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी धमकी आणि बिश्नोई टोळीतील कार्यकर्त्यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा संबंध जोडला तेव्हा परिस्थिती जुळली. यानंतर मुनव्वर फारुकीला गोळ्या घालण्याचा प्लॅन घेऊन हे दोघे आले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मुनव्वर फारुकी देखील आपल्या शोमध्ये धर्माशी संबंधित उपहास करत असल्याने ही भीती व्यक्त करण्यात आली होती. यावरून बिश्नोई टोळीही संतापली आहे. मुनव्वर हा टोळीच्या टार्गेटवर असल्याची माहिती मीडिया हाऊसच्या काही अधिकाऱ्यांनी दिली.
वाचा: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? वाचा तिच्याविषयी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कारण सलमान खान हा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. त्यापाठोपाठ मुनव्वर देखील निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित बातम्या