प्रसिद्ध कॉमेडियन आणि ‘बिग बॉस सीझन १७’चा विजेता मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी हुक्का बारमधून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी मुंबईतील एक हुक्का बारवरमध्ये छापा टाकून तिथून काही लोकांना ताब्यात घेतले होते. यात मुनव्वर फारुकीचा देखील समावेश होता. मुनव्वरसोबतच इतर ६ जणांनाही मुंबई पोलिसांनी या छापेमारीत ताब्यात घेतले. मात्र, प्राथमिक चौकशीनंतर मुनव्वर फारुकी याला सोडून देण्यात आल्याचे समोर येत आहे. छापेमारीत ताब्यात घेतल्यानंतर काही गोष्टींची चौकशी करूनच मुनव्वर फारुकी याला सोडून देण्यात आले आहे. तर, मीडिया रिपोर्टनुसार मुनव्वर आता त्याच्या नव्या प्रोजेक्टसाठी परदेशी रवाना झाला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त व्हायरल होताच मुनव्वर फारुकी याने विमानतळावरून स्वत:चा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी थकलो आहे. पण प्रवास करत आहे.’
एकीकडे मुनव्वर आणि त्याची टीम आपला या छाप्याशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे या छाप्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने ‘फ्री प्रेस जनरल’ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आमच्या पथकाने हुक्का बारवर छापे टाकले. हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून तिथे सापडलेल्या गोष्टींची चौकशी केली जात आहे आणि ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये मुनव्वर फारूकीचाही समावेश आहे.’
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने एका हुक्का बारवर छापा टाकला होता. पोलिसांनी छापा टाकलेल्या हुक्का बारमधून तब्बल सात जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आणि पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्यांनी मुनव्वर फारुकीला सोडून दिले. मात्र, या प्रकरणी मुनव्वर फारुकी किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.