Mukesh Khanna Shaktimaan 2: बॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना नुकतेच ‘शक्तिमान’च्या गेटअपमध्ये पत्रकार परिषदेला पोहोचले होते. त्यांना या अवतारात पाहून लोकांनी जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांना वाटत होतं की त्यांना हे सिद्ध करायचं आहे की त्यांच्याइतका शक्तिशाली ‘शक्तिमान’ दुसरा कोणीही असू शकत नाही. त्यांच्या व्हिडिओवर अनेक कमेंट्स देखील आल्या होत्या. आता मुकेश खन्ना यांनी यावर मोठी पोस्ट लिहिली असून आपण रणवीर सिंहपेक्षा स्वत:ला चांगले सिद्ध करण्यासाठी नाही, तर इतर काही कारणांसाठी या गेटअपमध्ये आलो असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुकेश खन्ना यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, ‘या कपड्यांमुळे आणि पत्रकार परिषदेमुळे माझ्या प्रेक्षकांमध्ये सुरू झालेला गैरसमज दूर करण्यासाठी मी इथे आलो आहे. पण, पुढचा शक्तिमान मीच होईन हे जगाला स्पष्ट करण्यासाठी आलो आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. याचे कारण समजावून सांगतो.’
पुढे मुकेश खन्ना यांनी म्हटले की, ‘पहिली गोष्ट म्हणजे मी पुढचा शक्तिमान असेन असे का म्हणताय. मी आधीच पहिला शक्तिमान आहे. दुसरा शक्तिमान तेव्हा असेल, जेव्हा आधीच एक शक्तिमान असेल आणि तो शक्तिमान मी आहे. माझ्याशिवाय दुसरा शक्तिमान असूच शकत नाही. शक्तिमान म्हणून मला एक वारसा निर्माण करायचा आहे.’
‘दुसरं म्हणजे मी रणवीर सिंहपेक्षा सरस आहे किंवा जो शक्तिमानचे कवच धारण करेल आणि पुढचा शक्तिमान बनेल त्यापेक्षा मी सरस आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी इथे आलेलो नाही.’
जुन्या शक्तिमानकडे २७ वर्षांचा रेडीमेड प्रेक्षकवर्ग असल्याने नव्या शक्तीमानपेक्षा जुना शक्तिमान हे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल, असे वाटल्यामुळेच मी आजच्या पिढीला जुना शक्तिमान म्हणून खास संदेश द्यायला आलो होतो. त्यामुळे पुढचा शक्तिमान लवकरच येईल याची खात्री बाळगा. तो कोण असेल, हे मी सांगू शकत नाही कारण मलाही माहीत नाही. त्याचा शोध सुरू आहे.' मुकेश खन्ना यांनी स्वत:ची एक देशभक्तीपर प्रश्नमंजुषाही पोस्ट केली आहे.
मुकेश खन्ना यांनी अनेकदा रणवीर सिंहला शक्तीमान बनवू इच्छित नसल्याचे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शक्तिमान बनण्यासाठी एका नव्या चेहऱ्याची गरज असल्याचेही म्हटले होते.