mukesh khanna Shaktimaan 2 : अभिनेते मुकेश खन्ना यांना पुन्हा एकदा शक्तिमानच्या अवतारात पाहून काही चाहते खूश झाले आहेत. तर, दुसरीकडे काही लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. खरं तर मुकेश खन्ना जेव्हा शक्तिमानचा गणवेश परिधान करून माध्यमांसमोर आले, तेव्हा लोकांनी त्यांच्या लूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मुकेश खन्ना वयाच्या ६६व्या वर्षी शक्तीमानचा गणवेश परिधान करताना दिसले. यावेळी, लोकांनी त्यांच्या पोटाची आणि पांढऱ्या केसांची खिल्ली उडवली. त्यांची खिल्ली उडवत ट्रोलर्सनी त्याना 'पेटुमान' आणि 'बुढामान' असे संबोधले.
अभिनेते मुकेश खन्ना बऱ्याच दिवसांपासून ‘शक्तिमान’चा चित्रपट आणि मालिका परत आणण्याचे आश्वासन देत होते. नुकताच जेव्हा त्यांनी याचा टीझर व्हिडिओ रिलीज केला, तेव्हा ते स्वत: शक्तिमानचा ड्रेस परिधान करून दिसले होते. यावेळी वयोमानपरत्वे मुकेश खन्ना यांचे वाढलेले पोट आणि पांढरे केस पाहून ट्रोलर्स लगेच जागे झाले. एका युजरने लिहिलं की, ‘कोणीतरी माझं बालपण परत करा आणि ही वेळ घ्या. एका व्यक्तीने लिहिले की, ’भाई, लहानपणी हे पाहून मला आनंद व्हायचा, आता मला लाज वाटते.'
या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी मुकेश खन्ना यांना जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कमेंट सेक्शनमध्ये एका व्यक्तीने लिहिले की, ‘यांना कुणीतरी शक्तिमानमधून बाहेर काढा रे. आमचे बालपणीचे दिवस गेले, पण अजून म्हातारपण आलेले नाही.’ एका युजरने हसून इमोजी बनवून लिहिलं की, ‘सर तुम्ही स्वत: शक्तिमानची भूमिका करा, आता दुसरा शक्तिमान योग्य ठरणार नाही.’ एका ट्रोलरने लिहिले की, ‘त्यांनी बालपणीच्या सगळय आठवणींची वाट लावून टाकली.’ मुकेश खन्ना यांच्या सगळ्या वेगवेगळ्या व्हिडिओंवर लोकांनी अशाच अनेक कमेंट्स केल्या आहेत. शक्तिमान मालिका एकेकाळी दूरदर्शनसाठी जबरदस्त टीआरपी आणत होती.
१९९७ साली सुरू झालेल्या या मालिकेने लहान मुले आणि मोठ्यांच्या मनावर बराच काळ राज्य केले आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. पण नंतर जेव्हा शो बंद झाला, तेव्हा तो कधीच परतला नाही आणि चाहते त्याची वाट पाहत राहिले. मध्यंतरी मुकेश खन्ना यांनी शक्तिमानवर चित्रपट आणण्याची घोषणा केली होती. पण आता चाहत्यांनी नुकताच स्वत: हा पोशाख परिधान करून सर्वांना आश्चर्यचकित केले.