मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush: 'तुझ्या धर्माचा खेळ करशील का?', सैफवर संतापले मुकेश खन्ना

Adipurush: 'तुझ्या धर्माचा खेळ करशील का?', सैफवर संतापले मुकेश खन्ना

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 05, 2022 01:45 PM IST

Mukesh Khanna on Adipurush teaser: सध्या आदिपुरुष हा चित्रपट चर्चेत आहे. टीझर पाहाता नेटकऱ्यांनी चित्रपटावर टीका केली आहे.

मुकेश खन्ना
मुकेश खन्ना (HT)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'आदिपुरुष.' या चित्रपटाचा टीझर २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. आदिपुरुष' चित्रपटात मोठ्या प्रमाणावर विएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये प्रभास प्रभू राम यांच्या भूमिकेत आहे. क्रिती सेनॉनने जानकीची, तर सैफ अली खानने लंकेशची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याशिवाय देवदत्त नागे या मराठमोळ्या अभिनेत्याने चित्रपटामध्ये महत्त्वाचे पात्र साकारले आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, अभिनेते मुकेश खन्ना यांनी सैफवर निशाणा साधला आहे. 'हिंदू देव-देवतांच्या लूकसोबत मस्करी केली तर यांचा चित्रपट कुणी पाहाणार नाही' असे मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे.

मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष चित्रपटाचा टीझर पाहिला. त्यानंतर एक व्हिडीओ त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. ''हिंदू धर्माचा नुसता खेळ करुन ठेवला आहे. देवी-देवतांच्या लूकमध्य़े काही बदल केलात तर तुमचा सिनेमा चालणार नाही. सगळ्याच वाहिन्यांवर एकच बातमी दाखवतायत की चित्रपटात रावण बनलेला सैफ खिलजी वाटत आहे. त्यांचे बरोबर आहे, हा रामायणातील रावण वाटतच नाही. या रावणाला मुघलांसारखा लूक दिल्यावर कसा दिसेल हा रावण. कुठे राम, कुठे रामायण आणि कुठे हा मुघलांचा लूक? विनोद आहे का हा? नाही चालणार सिनेमा. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त स्पेशल इफेक्ट्स दिल्याने सिनेमा हिट होईल. तर ते चुकीचे आहे. १०० करोड खर्च करा किंवा १००० करोड खर्च करा. रामायणावर असे सिनेमे बनत नाहीत'' असे मुकेश खन्ना म्हणाले.
वाचा: चित्रपट आहे की कार्टून; व्हीएफएक्समुळे ‘आदिपुरुष’ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

पुढे ते सैफवर संताप व्यक्त करत म्हणाले, "तुम्ही लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत आहात. जेव्हा तू (सैफ) म्हणाला होतास की आम्ही रावणाची व्यक्तीरेखा बदलेल्या स्वरुपात आणतोय. आता टीझर पाहिल्यावर जी व्यक्तीरेखा समोर आली ती हिंदू धार्मिक असलेल्याने पाहिल्यावर टीका करेल. या भूमिकेला विरोध करेल. तुम्ही कोण आहात रामायणातील व्यक्तीरेखा बदलणारे? तू तुझ्या धर्मातील धार्मिक व्यक्तिरेखांना बदलशील का?''

WhatsApp channel