Mrunal Thakur Luxurious Apartment: टीव्ही मालिका विश्वातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण, यावेळी अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मृणाल ठाकूरने तिच्या वडिलांच्या साथीने मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात आलिशान घर खरेदी केले आहे. मृणालने ही दोन घरं कंगना रनौतच्या कुटुंबाकडून तब्बल १० कोटी रुपयांमध्ये विकत घेतली आहेत. या दोन अपार्टमेंट अतिशय आलिशान आहेत. या घरांची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण झाली असून, त्यासाठी अभिनेत्रीने मुद्रांक शुल्का म्हणून मोठी रक्कम भरली आहे.
मृणाल ठाकूर आणि तिचे वडील उदयसिंह भटेसिंह ठाकूर यांनी कंगना रनौतचा भाऊ अक्षत दीप रनौत याच्याकडून अंधेरी पश्चिम येथील ओबेरॉय स्प्रिंग्स नावाच्या प्रोजेक्टमध्ये एक अपार्टमेंट ५ कोटी रुपयांना तर, एक अपार्टमेंट कंगनाचे वडील अमर दीप सिंह रनौत यांच्याकडून ५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या खरेदीची माहिती कागदपत्रांमध्ये दिली आहे.
सध्या अभिनेत्री याच सोसायटीत राहत आहे. या दोन्ही अपार्टमेंटची नोंदणी महिनाभरापूर्वी म्हणजेच २५ जानेवारी २०२४ रोजी झाल्याचे नोंदणी कागदपत्रांवरून लक्षात येत आहे. यातील पहिले अपार्टमेंट ९४.४६ स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेले असून, त्यासाठी ३० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. त्याच वेळी, दुसरे अपार्टमेंट ९२.६६ चौरस मीटरचे आहे, ज्यासाठी देखील ३० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने हिंदी आणि तेलुगु दोन्ही चित्रपटांमध्ये काम करून मनोरंजन विश्व गाजवले आहे. 'मुझसे कुछ कहती...ये खामोशियां' आणि 'कुमकुम भाग्य' या टेलिव्हिजन मालिकांमधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर मृणाल ठाकूर हिने 'लव्ह सोनिया'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर, २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सुपर ३०' आणि 'बाटला हाऊस' या चित्रपटांद्वारे तिने मनोरंजन विश्वात ओळख मिळवली. याशिवाय तिने शाहिद कपूरसोबतही काम केले आहे. तर, तिचा ‘सीता रामम’ हा साऊथ चित्रपटही खूप गाजला. मृणाल ठाकूर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.