दिवाळीपासून बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भुल भुलैय्या ३ आणि सिंघगम अगेन या चित्रपटांची टक्कर पाहायला मिळाली होती. अशातच मराठी इंडस्ट्रीमधील 'गुलाबी' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. हे पाहून सर्वांना आनंद झाला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ‘गुलाबी’ चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शानपूर्वीच एक कोटींचा गल्ला जमवला आहे. असा विक्रम साधणारा ‘गुलाबी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बुकिंग सुरू होताच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी तिकिटे आरक्षित केली आहेत. या चित्रपटाचे प्री-बुकिंग अवघ्या एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे. त्यामुळे चित्रपटात काहीतरी वेगळी गोष्ट पाहायला मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे.
नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. 'गुलाबी' चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.
वाचा: चार वर्षांनी मायदेशी परतलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे व्यवसायात पदार्पण, मुंबईत सुरू केले रेस्टॉरंट
दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “पूर्वप्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे. प्रेक्षकांचा हा पाठिंबा ‘गुलाबी’ चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही या प्रवासाचा आनंद घेत आहोत. ‘गुलाबी’ चित्रपटात मैत्री आणि स्वप्नांचा एक सुंदर प्रवास दाखवला आहे. लोकांच्या हृदयात ‘गुलाबी’ने आधीच स्थान मिळवले आहे याचा खूप आनंद होतो. प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल याची खात्री आहे.’’