Movies Releasing This Week: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा बॉक्स ऑफिसवर जवळजवळ रिकामाच गेला होता. गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर कल्ला सुरू होता. मात्र, आता या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी या आठवड्यात काही नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर, दुसरीकडे ओटीटीवर देखील काही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चला तर, जाणून घेऊया या आठवड्यात कोणते नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत...
शाहिद कपूर आणि क्रिती सेननचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट ९ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर येत आहे. हा एक रोमँटिक साय-फाय ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा माणूस आणि रोबोट यांच्यातील प्रेमावर आधारित आहे. या चित्रपटात शाहिद रोबोट असणाऱ्या क्रितीच्या प्रेमात पडतो. आता ही कथा प्रेक्षकांना किती भावणार, हे लवकरच कळणार आहे.
‘जेलर’नंतर रजनीकांत त्यांच्या चाहत्यांना 'लाल सलाम' म्हणायला सज्ज झाले आहेत. रजनीकांत यांचा हा तमिळ चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ५ फेब्रुवारीला रिलीज झाला होता. हा चित्रपट त्याच्या शीर्षकामुळे आणि रजनीकांत यांच्या लूकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे.
‘मिर्ग’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्यासह राज बब्बर, अनुप सोनी आणि श्वेताभ सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. तरुण शर्माने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हे एक थ्रिलर ड्रामा आहे.
शाहरुख खानच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'भक्षक'मध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, याची कथा अनाथाश्रमातील मुलींवर होणाऱ्या बलात्काराचा पर्दाफाश करण्याच्या प्रयत्नांभोवती फिरते. या चित्रपटात भूमी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘लंटराणी’ हा चित्रपट ‘झी ५’वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जितेंद्र कुमार, जॉनी लीव्हर आणि जिशू सेनगुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन गुरविंदर सिंह, कौशिक गांगुली आणि भास्कर हजारिका यांनी केले आहे.