ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रहमान यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तीन मुलांचा बाप असलेले ए. आर. रहमान लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानो यांना घटस्फोट देणार आहेत. सायरा बानो यांच्या वकिलांनी दिलेल्या जबाबानंतर ही बातमी समोर आली आणि दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे कळाले. या घटस्फोटामागे दोघांमधील सामंजस्याचा अभाव आणि मानसिक असमतोल कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे. पण लोकांना धक्का बसला की, रहमानच्या घटस्फोटाची बातमी आल्यानंतर काही मिनिटांनंतर त्याची मूळ संगीतकार मोहिनी डे देखील घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आता मोहिनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मोहिनी आणि रहमान यांच्या घटस्फोटच्या बातम्या ऐकून अनेकांनी त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु केल्या. रहमान आपली पत्नी सायरापासून विभक्त होऊन मोहिनीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करू इच्छित असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र, या मुद्द्यावर दोन्ही बाजू गप्प असल्याने याचा ठोस पुरावा कोणाकडेही नव्हता. रहमान यांची मुले आणि पत्नी यांनी मात्र ही बाब लज्जास्पद असल्याचे सांगत अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. पण आता पहिल्यांदाच रहमानची कथित गर्लफ्रेंड मोहिनी डे हिने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. तसेच रहमान तिच्या वडिलांसारखा असल्याचे म्हटले आहे.
मोहिनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात ती सांगत आहे की एआर रहमान तिचा रोल मॉडेल आहे आणि तिच्या वडिलांसारखा आहे. संगीतकाराने सांगितले की, त्यांच्या मनात एकमेकांबद्दल खूप आदर आहे. मोहिनी डेने आपल्या पोस्टमध्ये लोकांना तिच्यावर दया दाखवण्याचे आणि खासगीपणाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. कारण घटस्फोट ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे आणि ही प्रक्रिया अतिशय वेदनादायक आहे.
मोहिनीने हा व्हिडीओ शेअर करत एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे. " मला विश्वास बसत नाही की माझ्याविषयी आणि रहमान सरांविषयी इतकी चुकीची माहिती लोक कसे पसरवू शकतात? माध्यमांनी दोन वेगवेगळ्या घटनांचा संबंध जोडला असल्याने या सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत" असे मोहिनी म्हणाली आहे.
वाचा: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी
या पोस्टमध्ये मोहिनीने पुढे म्हटले की, "मी रहमान सरांसोबत ८.५ वर्षे चित्रपटांसाठी आणि टूरवर असताना एका मुलीसारखे काम केले. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. लोक असा विचार करत आहेत हे पाहून मला खूप वाईट वाटले. ए. आर. रहमान हे एक दिग्गज आहेत आणि माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. माझ्या आयुष्यात असे अनेक रोल मॉडेल आणि वडील आले आहेत, ज्यांनी माझ्या संगोपनात आणि करिअरमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे."