Mohammed Rafi: अभिनेत्याच्या एका अटीमुळे मोहम्मद रफींनी एका श्वासात गायले गाणे! वाचा किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mohammed Rafi: अभिनेत्याच्या एका अटीमुळे मोहम्मद रफींनी एका श्वासात गायले गाणे! वाचा किस्सा

Mohammed Rafi: अभिनेत्याच्या एका अटीमुळे मोहम्मद रफींनी एका श्वासात गायले गाणे! वाचा किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 31, 2024 01:22 PM IST

Mohammed Rafi Death Anniversary: मोहम्मद रफी यांच्या आवाजाने सगळेच तल्लीन होऊन जातात. मात्र, त्यांचे एक गाणे असे होते, जे त्यांनी एका श्वासात गायले होते. ते ही एका अभिनेत्याने घातलेल्या अटीमुळे.

Mohammed Rafi
Mohammed Rafi

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी आहे. संपूर्ण कारकि‍र्दीत तब्बल ४५०० गाणी गावून श्रोत्यांना वेड लावणाऱ्या मोहम्मद रफींची आजही गाणी ऐकायला आवडतात. रफींनी आपल्या आवाजाच्या जादूने त्यांनी श्रोत्यांना अक्षरशः वेड लावले होते. आसामी, कोकणी, भोजपुरी, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, तेलुगु, गुजराती, पंजाबी, बंगाली, मराठी, डच आणि स्पॅनिश भाषेतही त्यांनी गाणी गायली. पण सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले त्यांचे गाणे म्हणजे 'बहारों फूल बरसाओ.' आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया खासगी आयुष्याविषयी...

कोटला येथे मोहम्मद रफींचा झाला जन्म

२४ डिसेंबर १९२४ या दिवशी अमृतसरच्या कोटला सुलतान सिंह येथे राहणाऱ्या हाजी अली मोहम्मद यांच्या घरात मोहम्मद रफी यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने मोहम्मद रफी आपल्या भावासोबत नाव्ह्याच्या दुकानात काम करत होते. हेच काम करत असताना त्यांच्या कानावर एका सुफी साधूच्या गाण्यांचा आवाज पडत होता. या सुफी गाण्यांमुळे रफी यांच्यातील कला देखील जागी झाली होती. हळूहळू त्यांनी आपल्या कलेला प्राधान्य देऊन, पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. मोहम्मद रफी यांच्या आवाजाने सगळेच तल्लीन होऊन जातात.

किशोर आणि रफी यांची मैत्री

रफी यांना घरचे लोक 'फिको' या नावाने हाक मारत. गावातील फकीर जी गाणी गात, तीच रफीने बालपणापासून गायला सुरुवात केली. त्यांची गाण्यातली तयारी इतकी होती की, वयाच्या तेराव्या वर्षी एका मैफलीत कुंदनलाल सहगल यांच्याबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. साधारणपणे १९५० ते १९७० पर्यंत मोहम्मद रफी यांनी पार्श्वसंगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. नेहरुंनी देखील त्यांना एकदा आपल्या घरी मैफल करण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र 'आराधना'नंतर गायक किशोर कुमार अव्वल स्थानी पोहोचले. परंतु किशोर आणि रफी यांची मैत्री कायम होती. काही चित्रपटांत किशोर यांच्यासाठी रफी यांनी आवाजही दिला आहे.

‘दिल के झरोखे में’ गाणे गायले एका श्वासात

तसेच शम्मी कपूर आणि रफी यांच्यामध्ये देखील चांगली मैत्री होती. एकदा शम्मी कपूर त्यांच्या चित्रपटातील गाण्यासाठी विचार करत होते. काय गाणे असणार, कोण गाणार आणि बरेच काही प्रश्न त्यांना पडले होते. ‘दिल के झरोखे में’ हे गाणे करण्याचे शम्मी यांनी ठरवले. मात्र, या गाण्यासाठी त्यांनी रफी यांच्यासमोर अट ठेवली होती. एका श्वासात हे गाणे रेकॉर्ड करावे असे शम्मी म्हणाले आणि रफी यांनी ते केले. त्यावेळी रफी यांचे ब्रह्मचारी या चित्रपटातील हे गाणे तुफान हिट ठरले होते.
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी

३१ जुलै १९८० साली रफी यांचे निधन झाले. आज रफीसाहेब हे आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आपल्यामध्ये आहेत. ज्यावेळी त्यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक आले होते. अंत्ययात्रेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळचं कोणी तरी लांब जात असल्याची भाव मनात येत होती. त्यांना दाटून येत होते.

Whats_app_banner