Shah Rukh Khan Birthday Celebration: दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच २ नोव्हेंबरला बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने त्याचा ५८वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याच्या वाढदिवसाची चाहत्यांना खूप उत्सुकता होती. दरवर्षीप्रमाणे या वेळीही 'बादशाह'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपासूनच चाहते त्याच्या 'मन्नत' या आलिशान बंगल्याच्या बाहेर जमले होते. मात्र, यावेळी किंग खानच्या चाहत्यांना 'मन्नत'च्या बाहेर जमणे चांगलेच महागात पडले आहे. या ठिकाणी झालेल्या गर्दीतून तब्बल ३० मोबाईल फोन चोरट्यांनी लंपास केले आहेत.
शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे मोबाईल 'मन्नत'च्या बाहेरून चोरीला गेले आहेत. त्याचबरोबर आता सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. मुंबई पोलिसांनी देखील ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. शाहरुख खानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 'मन्नत'च्या बाहेर जमलेल्या चाहत्यांचे ३०हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याची एक झलक पाहण्यासाठी 'मन्नत' बाहेर जमलेल्या गर्दीचा फायदा या चोरट्यांनी घेतला. सादर प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई पोलीस एफआयआर केल्यानंतर पुढील तपस करत आहेत.
'बॉलिवूड किंग' शाहरुख खानचा यंदाचा वाढदिवस खूप खास होता. अभिनेत्याने त्याचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला आहे. किंग खानच्या प्रत्येक अपडेटची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुख खानने या वर्षी त्याच्या 'जवान' आणि 'पठाण' या धमाकेदार चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. इतकेच नाही, तर आता चाहते किंग खानच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी, शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'डंकी'ची 'डंकी ड्रॉप १' ही पहिली झलक रिलीज झाली आहे. चित्रपटाचा हा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यामुळे आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खानचा हा चित्रपट काय कमाल करतो आणि कोणते रेकॉर्ड मोडीत काढतो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
संबंधित बातम्या