Amey Khopkar on Fawad Khan Film: भारतीय इंडस्ट्रीमध्ये पाकिस्तानी कलाकारांना प्राधान्य देऊ नका असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनापक्षाने कायमच म्हणणे असते. पुलवामा हल्ला झाल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना सतत विरोध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होता. आता यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेळ आली तर या चित्रपटांना विरोध करण्यासाठी कडक आंदोलन करु असे मनसे नेत्याने म्हटले आहे.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात 'हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही' असे म्हटले आहे. पाकिस्तानी स्टार फवाद खान आणि माहिरा खान २०२२मध्ये प्रदर्शित झालेला 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' आता भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक बिलाल लशारी आणि माहिरा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हे अपडेट शेअर केले. याविषयी माहिती मिळताच अमेय खोपकर यांनी कडक आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. तसेच त्यांनी 'मी इतर राज्यातील जनतेला आणि पक्षांना आवाहन करतो की, त्यांनी आपापल्या राज्यात याला विरोध करावा' असे म्हटले आहे.
मनसे नेते अमेय खोपकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी उरी येथे झालेल्या हल्लाचा उल्लेख करत म्हटले की, 'सीमेवर आपले सैनिक मरत आहेत, आमच्या शहरांवर हल्ले होत आहेत. आम्हाला इथे पाकिस्तानी कलाकारांची गरज का आहे, आमच्याकडे पुरेसे टॅलेंट नाही का? भारतात येण्याचे धाडस करणाऱ्या कोणत्याही पाकिस्तानी अभिनेत्याला आम्ही पराभूत करू. कला आणि राजकारण वेगळं आहे, पण आपल्या सैनिकांच्या किंमती पुढे कला नको...'
वाचा: ७० दिवसातच ‘बिग बॉस मराठी ५’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी होणार फिनाले
पुढे अमेय खोपकर म्हणाले, 'आम्ही त्यांना येऊ देणार नाही. हवं तर ही धमकी समजा. गेल्या आठवड्यापर्यंत हल्ले झाले आहेत. असे असूनही पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे बघणार? असा विचारही तुम्ही कसा करु शकता? आम्ही त्यांना भारतात पायही ठेवून देणार नाही. त्यासाठी कडक आंदोलन करु.'
दिग्दर्शक बिलाल लशारी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. हा चित्रपट भारत, पंजाबमध्ये बुधवार २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. दोन वर्षे उलटली असली तरी चित्रपट पाकिस्तानमध्ये हाऊसफूल होताना दिसत आहे. आता भारतामधील पंजाबी प्रेक्षक या चित्रपटाचा अनुभव घेऊ शकतात असे बिलाल म्हणाले.