मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: 'पठाण' रिलीज होताच मनसेचा कडक इशारा, ‘आमचा शाहरुखला विरोध नाही, पण...’
अमेय खोपकर
अमेय खोपकर (HT)

Pathaan: 'पठाण' रिलीज होताच मनसेचा कडक इशारा, ‘आमचा शाहरुखला विरोध नाही, पण...’

25 January 2023, 14:46 ISTAarti Vilas Borade

MNS: मल्टीप्लेक्सवाल्यांनी मराठी सिनेमाला स्क्रीन दिली नाही तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ हा चित्रपट आज (२५ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. आता हा चित्रपट संपूर्ण भारतात जवळपास ४ हजार पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळण्याचा मुद्दा पुन्हा डोकं वर काढत आहे. दरम्यान, मनसे नेते अमेय खोपकर यांनी 'मल्टीप्लेक्सवाल्यांनी मराठी सिनेमाला स्क्रीन दिली नाही तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा' दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अमेय खोपकर यांनी व्हिडीओ शेअर करत, 'पठाण हा हिंदी चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या हिंदी चित्रपटाला आमचा विरोध नाही. पठाण हा शाहरुख खानचा कमबॅक आहे. लोकांनी तो पाहावा. पण गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास चार आठवड्यांपासून वेड हा मराठी सिनेमा संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होऊन चांगले कलेक्शन आणि बिझनेस करतोय. त्यानंतर वाळवी आला. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात चांगल बिझनेस केला. त्यानंतर आज बांबू आणि पिकोलो प्रदर्शित होत आहे. तसेच विक्टोरिया देखील प्रदर्शित झाला आहे. असे अनेक चित्रपट आहेत' असे म्हटले.
वाचा: अजय देवगण आणि तब्बूच्या 'भोला'चा टीझर पाहिलात का?

पुढे थिएटर मालकांना इशारा देत अमेय खोपकर म्हणाले, 'मल्टीप्लेक्स किंवा सिंगल स्क्रिन थिएटरनी एकाही मराठी चित्रपटाला स्क्रीन दिलेली नाही. थिएटर्स मिळत नाहीयेत. मी याचा निषेध करतो. जर का मल्टीप्लेक्सवाल्यांनी मराठी चित्रपटांना थिएटर्स आणि चांगली स्क्रीन दिली नाही तर मी त्यांना इशारा देतोय की महाराष्ट्रभर आंदोलन होईल. आम्ही बघून घेऊ की कसे मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाहीत.'

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी चित्रपटांमुळे स्क्रीन न मिळण्याचे समोर आले होते. तसेच काही मराठी चित्रपटांचे शो देखील रद्द करण्यात आले होते. पण आता मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळावी यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे.

विभाग