Mithun Chakraborty Struggle Story:भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मंगळवारी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात झालेल्या ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना हा सन्मान प्रदान केला. यावेळी कार्यक्रमाला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गज कलाकार उपस्थित होते. या प्रसंगी मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या.यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाच्या काळातील काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या नृत्य शैलीने सगळ्यांनाच भुरळ घातली. आजही त्यांच्या डान्सचे दिवाने लाखो लोक आहेत. मात्र, मिथुन चक्रवर्ती यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांना का मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. इतकंच नाही तर, त्या काळात मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे चित्रपटसृष्टीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या आठवणी त्यांनी स्वतः सगळ्यांसोबत शेअर केल्या आहेत.त्यावेळी मिथुन चक्रवर्ती यांना सांगण्यात आलं होतं की, ‘या इंडस्ट्रीला काळा रंग चालत नाही’. यासोबतच त्यांचा अनेक प्रकारे अपमान केला गेला होता. मात्र, तरीही त्यांनी आपला धीर खचू दिला नाही.
सगळीकडे अशाच प्रकारचा अपमान सहन केल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी मनाशी एक निश्चय केला. त्यांनी ठरवलं, आता असा डान्स करायचा की लोकांचं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे किंवा रंगाकडे लक्ष न जाता, माझ्या पायांकडे गेले पाहिजे. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, ‘मी त्यावेळी असा नाचलो की खरंच लोक माझा रंग विसरून गेले. नव्या पिढीला संदेश देताना ते म्हणाले की, मी जर हे करू शकतो, तर तुम्ही देखील करू शकता. पण कुठल्याही परीस्थित खचून जाऊ नका. मनाने धीट राहा. सगळ्या गोष्टी तुम्ही सहज मिळवू शकता. मनात जिद्द असू द्या. तुम्ही झोपा पण स्वप्नांना झोपू देऊ नका.’
यादरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी खुलासा केला की,जेव्हा त्यांना यश मिळाले तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला होता. याविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘अहंकार आला होता, मात्र काही वेळातच मला जाणवले की, अशा वागण्याने मला मिळणाऱ्या संधी नष्ट होत आहे. या भावनेनेच मला पुन्हा जमिनीवर आणले.’