Helena Luke Passed Away : बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. हेलेना यांचे रविवार, ३ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले. हेलेना यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांच्या निधनाच्या दु:खातून इंडस्ट्री अद्याप सावरलेली नव्हती आणि आता या बातमीने सर्वांनाच दु:खी केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलेना अमेरिकेत राहत होत्या आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. यानंतरही त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले नाहीत. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोण होते, त्याची काळजी कोण घेत होते, हे अद्याप कळू शकलेले नाही. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेलेना ल्यूक या एक मॉडेल आणि अभिनेत्री होत्या. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याचे सारिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हेलेना ल्यूक यांच्याशी भेट झाली होती. पहिल्या नजरेतच दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. मिथुन आणि हेलेना यांचं लग्न झालं त्यावेळी हा अभिनेता आपल्या करिअरमध्ये संघर्ष करत होते. १९७९ साली दोघांनी लग्न केले आणि अवघ्या चार महिन्यांनी हेलेनाचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केले. दोघांचे लग्न तुटण्याचे कारण म्हणजे त्यांची योगिता बाली यांच्याशी वाढलेली जवळीक होती. तर, हीच गोष्ट हेलेना यांना खटकल्याने त्यांनी घटस्फोट मागितला होता. तर, दुसरीकडे दोघांमध्ये सतत वाद वाढत होते.
हेलेना ल्यूक यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत केवळ ९ चित्रपटांमध्ये काम केले होते. अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' या हिट चित्रपटात त्या झळकल्या होत्या. अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' चित्रपटातील ब्रिटिश राणीच्या भूमिकेमुळे त्या सर्वाधिक लोकप्रिय झाली होत्या. याशिवाय हेलेनाने 'भाई आखिर भाई होता है', 'ये नज्दीकियाँ', 'रोमान्स', 'साथ साथ', 'जुदाई', 'एक नया रिश्ता', 'आओ प्यार करेन' आणि 'दो गुलाब' या चित्रपटांमध्ये काम केले होते. इंडस्ट्री सोडल्यानंतर हेलेना डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करू लागल्या होत्या.