Mithun Chakraborty Discharged : बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना कोलकातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोके आणि छातीत दुखायला लागल्यामुळे मिथुन हे अस्वस्थ झाले होते. त्यानंतर त्यांना ब्रेनस्ट्रोक आल्याची माहिती समोर आली. आता १२ फेब्रुवारी रोजी मिथुन यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
'पीटीआय' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मिथुन यांची प्रकृती पूर्णपणे बरी आहे. सोमवारी रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. १० फेब्रुवारी रोजी मिथुन यांना कोलकातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आवश्यक त्या चाचण्या आणि रेडिओलॉजी तपासणी करण्यात आली. त्यावेळी MRI रिपोर्टमध्ये त्यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याचे समोर आले. तातडीने मिथुन यांच्यावर उपचार केल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाचा: रमशा फारुकी ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती
हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, 'मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. बघू, मी लवकरच कामाला सुरुवात करू शकतो आणि कदाचित मंगळवारपासून कामाला सुरुवात करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रकृतीची काळजी न घेतल्याबद्दल रागावले असल्याचे मिथुन यांनी म्हटले.
गेल्या वर्षी मिथुन चक्रवर्ती हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही शो 'सारेगामापा'मध्ये दिसले. या शोमध्ये ते परिक्षकाच्या भूमिकेत दिसले. तसेच त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने वडिलांसाठी एक क्यूट व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने दिलेला संदेश ऐकून मिथुनदांना अश्रू अनावर झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
मिथून चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करत, हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथून यांनी दिली. “मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे” असे ते म्हणाले होते.